घोटी – महाशिवरात्री दिवशी कोरोनाला हरविण्यासाठी घोटीतील कळसूबाई मित्र मंडळाने “ईश्वरा” ला साकडे घातले. इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दारणा नदी, त्रिंगलवाडी नदी, वाकी, खापरी नदी, भाम नदी या चारही नद्यांवरील धरणांच्या पाण्याचा संगम घोटी येथील सुविधा बंधाऱ्यावर होतो. या संगमावर प्राचीन अशी शंकराची पिंड आहे. ही पिंड घोटीच्या पंचक्रोशीत “ईश्वर ” म्हणून प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री निमित्त घोटीचे गिर्यारोहकांचे प्रसिद्ध असलेल्या कळसुबाई मित्र मंडळाने इगतपुरी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरभाऊ लहाने यांच्या हस्ते या संगमावर असलेल्या ईश्वराचा अभिषेक करून मनोभावे पूजा केली. सध्या कोरोनाने महाराष्ट्रात पुन्हा वर डोके काढले आहे. ह्या कोरोना नावाच्या राक्षसाला ठार मारून मानवाला कोरोनामुक्त करण्याचे साकडे “ईश्वराला” शिवभक्तांनी घातले. मास्क घालून तसेच सामाजिक अंतर ठेवून शासनाचे सर्व नियम पाळून महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली. महाशिवरात्रीच्या पूजेत इगतपुरी तालुका तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळू आरोटे, प्रवीण भटाटे, गजानन चव्हाण, अशोक हेमके, बाळासाहेब वाजे, सुरेश चव्हाण, भाऊसाहेब जोशी, उमेश दिवाकर, हिरामण लहाने, अरुण लहाने, शशिकांत चव्हाण, प्रशांत येवलेकर व इतर शिवभक्त सहभागी झाले होते.