घोटी – इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्तसंचार वाढला असून,आज सकाळी वासाळी येथील एका शेतकऱ्याने शेतीच्या रक्षणासाठी बांधून ठेवलेल्या कुत्र्याचा एका बिबट्याने फडशा पडल्याची घटना उघडकीस आली . दरम्यान प्रसंगावधान राखून या शेतक-याने या थरारक दृश्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रण केले. याबाबत वृत्त असे की,इगतपुरी तालुक्यातील वासाळी गावाजवळ बबन रघुनाथ झोले यांची शेती आणि घर आहे.या शेतीतील पिकाची वानरे नुकसान करतात म्हणून त्यांनी पाळलेल्या कुत्र्याला ते शेताच्या बांधावर बांधून ठेवतात.आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी शेताच्या बांधावर कुत्रे बांधून ते नाश्ता करण्यासाठी घरात आले.यावेळी त्यांनी आपल्या दोन मुलांना कुत्र्यासाठी भाकर घेऊन पाठवले. हे मुले भाकर घेऊन जात असताना त्यांना कुत्र्याला बिबट्या ठार करुन ओढत असल्याचे दिसले.तसेच ही मुले माघारी फिरून घरच्या ना झालेला प्रकार कथन केला.यावेळी सर्वजण घटनास्थळी आले आले असता बिबट्या फरार झाला. या शेतकऱ्यांने मृत कुत्र्याचे शव थोड्या अंतरावर नेऊन साखळीने एका लाकडाला बांधले आणि तेथे मोबाईलचा कॅमेरा चालू करून ते घरी परतले. अर्धा तासानंतर सर्वजण कुत्रा बांधलेल्या ठिकाणी गेले असता,कुत्र्याचे शव गायब झाल्याचे निदर्शनास आले.त्यांनी तात्काळ मोबाईल तपासला असता त्यात बिबट्या मृत कुत्र्याला फरफटत घेऊन जात असल्याचे चित्रण झाले झाले होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पूर्व भागातच बिबट्याने बलिकेवर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली होती.तर वन विभागाने या भागातून दोन बिबटे पिंजरा लावून जेरबंद केले होते.मात्र तरीही आज पुन्हा बिबट्याचे या भागात दर्शन झाल्याने तसेच ही घटना मोबाईल मध्ये कैद झाल्याने या भागात बिबट्याचा वावर वाढला असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.या बिबट्याचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.