घोटी – शेतात व बैलांमध्ये तुला वाटा देणार नाही, असे मोठ्या भावाने लहान भावास सांगितल्याचा राग आल्याने, रागाच्या भरात लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात हातातील धारधार कोयत्याने वार केले. या घटनेत जखमी भावाचा उपचार सुरू असताना निधन झाले. इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील ही घटना असून या प्रकरणी घोटी पोलिसांनी संशयितास अटक करून त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की, इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील हिरामण लक्ष्मण खादे व लालू लक्ष्मण खादे हे आपल्या कुटुंबांसह एकत्र राहतात. १० सप्टेंबर रोजी हिरामण खादे हा मोठा भाऊ दारूच्या नशेत असतांना लहान भाऊ लालू खादे यांच्यात घरगूती कारणावरून वाद सुरू झाला. या वादात मोठा भाऊ हिरामण याने मी तुला शेतीत व बैलात हिस्सा देणार नाही असे लालू यास सांगितले. त्यामुळे लालू यालाही या बोलण्याचा राग आला. मी तुला सोडणार नाही असे प्रत्युत्तर देत लालूने हातातील कोयत्याने मोठा भाऊ हिरामण खादे यांच्या डोक्यात वार केले. यात तो गंभीर जखमी झाले. दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना हिरामण लक्ष्मण खादे याचा मृत्यू झाला.
मयत हिरामण खादे यांची पत्नी लिलाबाई हिरामण खादे वय ३६ रा वासाळी हिने दिलेल्या फिर्यादीवरून घोटी पोलिसात लालू लक्ष्मण खादे याच्या विरुद्ध भादवी ३०२, ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयित लालू खादे यास अटक करण्यात आली आहे.पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक जालिंदर पळे, सहायक उपनिरीक्षक अनिल धुमसे, पोलीस हवालदार शेळके, भास्कर महाले, शीतल गायकवाड, लहू सानप आदी करीत आहे.