हिंस्त्र बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा : सरंपच अॅड. मारुती आघाण
घोटी -इगतपुरी तालुक्यातील खैरगाव शिदवाडी येथील ६८ वर्षीय वृद्ध महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला. यामध्ये महिला ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे. बुधाबाई चंदर आघाण मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. गावाजवळ शेतात घराजवळ ही घटना घडल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. इगतपुरीच्या वन विभागाला याबाबतची माहिती लोकनियुक्त सरपंच अॅड. मारुती आघाण यांनी दिली. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमुळे आदिवासी ग्रामस्थांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. मयत महिलेच्या वारसांना तातडीने मदत द्यावी. बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच आघाण यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी या गावात आपल्या गावाजवळील शेतात बुधाबाई आघाण यांचे कुटुंब राहते. गुरुवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास बुधाबाई लघुशंकेसाठी घराबाहेर गेली. काही सेकंदातच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला चढवला. आवाजामुळे बुधाबाई हिच्या मुलीने बाहेर येऊन पाहिल्याने आरडाओरडा केला. यामुळे बिबट्या पळून गेला मात्र हल्ला झालेली बुधाबाई चंदर आघाण ही महिला तोपर्यंत ठार झाली होती. याबाबत खैरगावचे सरपंच आघाण यांनी घोटी पोलीस ठाणे आणि इगतपुरीच्या वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी त्यांनी केली आहे. दरम्यान बिबट्याकडून नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढत असताना वन विभाग नेमके काय करीत आहे असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.