घोटी – घोटीत हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या काळ्या गुळासह नवसागर विकणाऱ्या व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर पोलीसांनी छापा टाकुन एका ट्रकसह १९ लाख रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. या प्रकरणी घोटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील संशयित आरोपी मयुर रतन वालझाडे याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, घोटी शहरातील व्यापारी मयुर रतन वालझाडे, वय २९, रा. नवनाथ नगर याच्या गोडाऊनवर हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणारा काळा गुळ व नवसागरची विक्री होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांना समजली. त्यांनी लागलीच वाडीव-हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव, नितीन पाटील यांच्यासह इगतपुरी, घोटी ठाण्यातील पोलीस पथकातील काही निवडक पोलीस पथक तयार करून घोटी येथील गोडाऊनवर छापा टाकण्याचे आदेश दिले. या पोलीस पथकाने दुपारी साडे तीन वाजता खाजगी वाहनाने घोटी सिन्नर उड्डाण पुलाजवळ जाऊन पाहणी केली असता ताराप्लाझा बिल्डीग येथे एका ट्रक मधुन काळ्या गुळाच्या गोण्या गोडाऊनमध्ये उतरावीत असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी विचारपुस केली असता हातभट्टीवर गावठी दारू बनवण्यासाठी लागणारा गुळ असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी त्वरीत छापा टाकून काळा गुळ, नवसागर व ट्रक ताब्यात घेऊन जप्त केला. या छाप्यात ६ लाख ८८ हजार कीमतीच्या जगरी पावडच्या ८२५ गोण्या, ९३ हजार कीमतीच्या हनुमान नाव असलेल्या ११३ जगरी पावडरच्या गोण्या, १ लाख ५२ हजार रूपये कीमतीच्या १९० पांढऱ्या रंगाच्या गोण्यातील काळा गुळ, ५६ हजार रूपये कीमतीच्या बारदानच्या ७० गोण्यामधील काळा गुळ, ३६ हजार कीमतीच्या १२० खराब काळ्या गुळाच्या भेल्या, ५६ हजार कीमतीचे १२५ काळ्या गुळाचे बॉक्स, ४४ हजार कीमतीचे ७९ नवसागरचे बॉक्स, ५ हजार कीमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा व १० लाख कीमतीचा अशोक लेलंड कंपनीचा ट्रक पोलीसांनी जप्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.