घोटी –इगतपुरी तालुक्यातील घोडेवाडी, टाकेद बु, टाकेद खु, बारशिंगवे, खेड, आधारवड या ठिकाणी होणाऱ्या ऊर्ध्व कडवा प्रकल्प भूसंपादन रद्द करण्यात यावे यासाठी इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकराच्या नोटिसा न देता गावी तलाठयांच्या सजेवर २ रोजी खमबाळे वसाहत येथे उपस्थित राहण्याबाबत नोटिसा सजेवर लावण्यात आलेल्या आहेत. मात्र यापूर्वीच प्रकल्पबधित शेतकऱ्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन देऊन हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान ऊर्ध्व कडवा प्रकल्पा मध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी व इतर शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी कुठलेही साधन राहणार नाही त्यामुळे येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे नियोजित ऊर्ध्व कडवा प्रकल्प परिसरातील गावे हे पेसा कायद्याअंतर्गत येत असून आदिवासी शेतकऱ्यांवर शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचीत ठेवीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जमिनी जबरदस्तीने संपादित केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील आणि शेतकरी संघटनेच्या वतीने प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना बरोबर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ, तालुकाध्यक्ष किसन शिंदे, संपर्क प्रमुख रामदास गायकर यांच्यासह उपतालुकाध्यक्ष अरुण जुंद्रे, शेतकरी अशोक वाजे, पपोट लहामगे, तुकाराम भालेराव, जयश्री पाटील, रविंद्र लहामगे, मॅचिंद्र लहामगे, शँकर चोथवे, नामदेव बोराडे, बंडू बांगर, पोपट भोईर,प्रकाश रुपवते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.