घोटी – बिबट्यांचे संचारक्षेत्र असलेल्या इगतपुरी तालुक्यात सर्वसामान्य नागरीक व लहान बालकांवर बिबट्यांकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्याच आठवड्यात खेडभैरव परिसरात असलेल्या ठाकूरवाडी शिवारात आजीसमवेत घरी जाणाऱ्या बालिकेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते. या घटनेला आठ दिवस उलटत नाही तोच त्याच परिसरात काल शनिवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घराजवळ असलेल्या ४५ वर्षीय युवकावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने बेसावधपणे हल्ला करून जखमी केले.
इगतपुरी तालुक्यातील खेड परिसरात काल रात्री बिबट्याच्या हल्याची घटना ताजी असतानाच व वनविभागाने ४ पिंजरे लावून व जनजागृती सुरू असताना देखील आज भर दुपारी घोडे वाडी येथील पंढरी घोडे या ३७ वर्षीय तरुणावर त्याच्या घरासमोर असलेल्या शेतात गव्हाची पाहणी करत असताना पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. त्याने प्रसंगावधान राखत प्रतिकार करून आरडा ओरडा केला असता बिबट्याने धूम ठोकली. यात युवकाच्या पाठीला हातावर व दंडावर बिबट्याने चावा घेतला आहे. बिबट्या भरवस्तीत घुसण्याचा कारण म्हणजे कही लोकांनी डोंगरास आग लावली आहेत त्यात आपला जीव वाचविण्यासाठी हे प्राणी मानवी वस्तीचा रस्ता धरत असून गावात कोल्हे, तरस इत्यादी प्राण्याचे दर्शनही होत असल्याचे गावकऱ्याकडून सांगण्यात येते.
या घटनेमुळे खेडभैरव ( काननवाडी / ठाकूरवाडी) परिसरात खळबळ उडाली असून वाड्यांवरील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजही वनविभागाने या घटनेची दखल घेत परिसरात दोन पिंजरे लावले असून बिबट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅपकॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
आवडू सोमा आवाली वय ४५ हा ठाकूरवाडी ( खेडभैरव मंदिराजवळ) हा युवक काल सायंकाळी घराजवळ उभा असताना बिबट्याने हल्ला करताच त्याने आरडाओरड केल्याने ग्रामस्थ धावले. ग्रामस्थांनी बिबट्याला पिटाळून लावून बिबट्याच्या हल्ल्यातून त्याला वाचवले. हि बाब युवा नेते सुनील वाजे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वनविभागाला घटनेची देऊन जखमी युवकास तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
गेल्याच आठवड्यात याच ठिकाणी एका बालिकेवर बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेनंतर वनविभागाने दोन पिंजरे लावले होते मात्र दोन दिवस पिंजरे ठेवूनही बिबट्याने हुलकावणी दिली होती. आता पुन्हा पिंजरे लावण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी एकाच आठवड्यात दोन इसमांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याने अद्यापही वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह व्यक्त केले जात आहे. शासनाकडून जखमीना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सुनील वाजे यांनी केली आहे. बिबट्या जेरबंद करण्यासाठी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल दत्तू ढोन्नर व वनरक्षक, वनमजूर आदी लक्ष ठेऊन आहेत.