घोटी – गिर्यारोहण हा असा एक खेळ आहे, जिथे शारीरिक शक्ती बरोबर मानसिक क्षमताही पणाला लागते.या दोन्हीही क्षमता मध्ये वाढ करायला शिकता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात, स्पर्धेच्या युगात तरुण पिढी तणावात येऊन व्यसनाधीन होऊन नैराश्यात जात आहे. त्यामुळे अशा तरुणांना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन स्वतःची शारीरिक व मानसिक स्थिती मजबूत करण्याचा मार्ग म्हणजे गिर्यारोहणाचा पर्याय होय. आपल्या आयुष्यात कोणत्याही बाबतीत जेव्हा ” शक्य नाही ” असे म्हणून आपण थांबतो ,तिथून पुढे गिर्यारोहणाचा खरा खेळ चालू होतो. कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक बाळू आरोटे, विठ्ठल केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कठीण असलेल्या अलंग किल्ल्यावर आज गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. लहानपणापासून शिस्तबद्ध गिर्यारोहणाची माहिती हवी त्यामुळे बालगोपालांना यामध्ये सहभागी करण्यात आले. अवघड किल्ले, उंच शिखर, डोंगर दऱ्या कसे चढणे, उतरणे तसेच निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेणे, तसेच प्रस्थारोहणाचे प्रात्याक्षिके करून घेण्यात आले. अशी विविध प्रकारची माहिती देऊन या मोहिमेत गिर्यारोहकांचे मनोबल वाढविण्याचे कार्य कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी केले. या उपक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळू आरोटे, विठ्ठल केकरे, प्रवीण भटाटे, अशोक हेमके, डॉ. महेंद्र आडोळे, निलेश पवार, पुरुषोत्तम बोराडे, सोमनाथ भगत, जैनम गांधी, मयूर मराडे, काळू भोर, प्रणिल चव्हाण, ओमकार रिके, अर्जुन पंडित, मनीषा मराडे, नगमा खलिफा, कृष्णा बोराडे, पुष्कर पवार आदी गिर्यारोहक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.