घोटी : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील अधरवड परिसरात शेतातून गेलेल्या विजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन शेतातील आंबा, जांभूळ, निंब, तसेच शेतातील चारा जळून खाक झाले. विजमंडळाच्या या कारभाराचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला. या घटनेत जवळपास तीनशे फळझाडे जळून खाक झाली. शेतातून गेलेल्या या विजवाहक तारा तात्काळ हटवून रस्त्याच्या मार्गाने नेण्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी होती मात्र विजवितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले.
याबाबत वृत्त असे की काल सोमवार रोजी सायंकाळी हि घटना घडली. आधरवड शिवारातील शेतातून गेलेल्या विजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने हि घटना घडली. या शॉर्टसर्किट मुळे शेतात झाडांना लागलेल्या आगीत दोन वर्षांपूर्वी लावलेली आंब्याची १०० झाडे, १५० जांभळाची झाडे, २५ कडुनिंबाची झाडे जळून खाक झाली तसेच शेजारील शेतकऱ्यांचेही तनसाचे उडवे व गवत हेही जळून खाक झाले.
दोन वर्षांपासून एलटी लाईनची आर्थींग तुटलेली ती जोडावी म्हणून अर्ज दिलेला मात्र अद्यापपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने ती स्थिती अद्यापही तशीच आहे. सदरची लाईन रस्त्याच्या बाजूने शिफ्ट करावी व भविष्यातही शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकरी व युवा सेनेचे पदाधिकारी मोहन ब-हे यांनी केली.
या झालेल्या नुकसानीत मोहन रामजी बऱ्हे, रामकृष्ण पंडित बऱ्हे,भास्कर यशवंत बऱ्हे, अजय लक्ष्मण बांडे,नितीन लक्ष्मण बऱ्हे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजवितरण कंपनी व महसुलविभागाने या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ भरपाई मिळवून देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
प्रशासनाने आम्हाला भरपाई द्यावी
गेल्या दोन वर्षांपूर्वीच इगतपुरी वीज महावितरण कँपनी ला आम्ही येथील कार्यलयात अर्ज व निवेदन देखील दिले होते लाईटच्या या तारा अगदी जमिनी पर्यंत पसरल्या होत्या त्यामुळेच हे शॉर्टसर्किट होऊन आमचे आंब्याची झाडे व जांबळीची झाडे जळाली आहे सबंधितांनी व प्रशासनाने आम्हाला भरपाई द्यावी
मोहन बऱ्हे – शेतकरी