घोटी – इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घोटीत शनिवारी आठवडी बाजार व रविवार असे दोन दिवस बंदचा निर्णय घोटी ग्रामपालिकेच्या वतीने घेण्यात आल्याने आज घोटीकरांनी शनिवार आठवडी बाजार कडकडीत बंद पाळला. नागरिकांनीही सुरक्षितता बाळगुन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामपालिका व पोलीस प्रशासनाने केली आहे.
आज घोटीत आठवडे बाजाराचा दिवस असूनही ठरल्याप्रमाणे सर्वच दुकानदार व व्यापारी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेतला. अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पिटल, मेडिकल, किराणा दुकाने, भाजीपाला आदी सेवा सुरू होत्या. अन्य साहित्याची दुकाने बंदच होती. स्थानिक नागरिकांनी या बंदला सकाळपासूनच सकारात्मक प्रतिसाद दिला.
उद्या रविवार घोटी शहरात संपूर्णतः बंद असणार असून शनिवार व रविवारी बंद पाळून सोमवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत या वेळेत सर्व दुकाने पूर्ववत सुरू होणार आहेत. शासकीय नियमांचे पालन करून बाजारपेठ दोन दिवस पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार घोटी ग्रामपालिकेने घेतला असून या आदेशाचे पालन सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे.
याबरोबरच ग्रामपालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकान्वये १५ मार्च पासून घोटी परिसरातील होणारे लग्न समारंभ घोटी ग्रामपालिका व पोलीस स्टेशनच्या परवानगीनेच करावे लागणार असून त्या लग्नाची मुहूर्तवेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वेळेतच असावे असे आदेश पत्रात नमूद केले आहे. तर १५ मार्च पासून राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रम उत्सव पुर्णतः बंद ठेवण्यात येतील. या बरोबरच घोटी गावातील धार्मिक स्थळे सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेतच खुली राहतील. धार्मिक विधींमध्ये फक्त ५ लोकांचा समावेश असणार आहे असे पत्रकात नमद करण्यात आले आहे.