पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली बैठक
नाशिक – तालुका निहाय, शहर निहाय, गाव निहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करून कोविड बाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती तसेच जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विभागाने डोअर टू डोअर तपासणी करून रुग्णांचा शोध घ्यावा. मृत्यू दर कमी करण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कोविड-१९ चा आढावा व उपाययोजनांबाबत चांदवड येथील मध्यवर्ती प्रशासकीय भवनमधील सभागृहात झाली. यावेळी चांदवड, देवळा, बागलाण या तालुक्यांची कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पार पडली. भुजबळ म्हणाले की, कोमॉर्बीड रुग्णांचा शोध घेऊन त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. या वर्गातील रुग्णांना योग्य ते औषधोपचार करून त्यावर लक्ष ठेवण्यात यावे. शहरात नव्याने रुग्ण वाढणार नाहीत त्यासाठी सूक्ष्म कंन्टेंनमेन्ट झोनचा वापर करावा. यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या शासकीय कोव्हीड टेस्टिंग लॅब मध्ये संशयितांचा स्त्राव पाठवावा, जेणेकरून जलद गतीने अहवाल मिळतील. ज्या तालुक्यामध्ये ऑक्सिजन बेड्स उपलब्ध नसतील त्या ठिकाणी कायमस्वरूपी ऑक्सिजन बेड्सची निर्मिती करण्यात यावी. तसेच येणाऱ्या काळात सटाणा तालुक्यात द्राक्ष बागायतदार यांनी बाहेरून येणाऱ्या व्यापारी लोकांबाबत विशेष काळजी घ्यावी, यासाठी आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी समन्वय राखत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या. नॉन कोव्हीड रुग्णांच्या बाबतीत आरोग्य विभागाने अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, त्या रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या दवाखान्यांमध्ये वेळेत योग्य ते उपचार करण्याचे निर्देश देखील भुजबळ यांनी यांनी यावेळी दिले.
यावेळी खासदार डॉ. भारती पवार, नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार दिलीप बोरसे यांनी चर्चेत भाग घेऊन विविध सूचना केल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुकास्तरावर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने केलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी यावेळी दिली.
यावेळी जि.प.उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य नूतन आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, दत्ता शेजुळ, जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी महेश पाटील, पांडुरंग कोल्हे, राजेश देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, डॉ. माणगे, डॉ. अहिरे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.