परवा ऑफिसमधून घराकडे येत असताना रस्त्यावर तीन ठिकाणी लग्नाचे मांडव दिसले. हे चित्र फार पूर्वी कधीतरी गावाकडे रहात असताना बघायला मिळायचं. घरापुढे मांडव, मांडवातली लगीनघाई, गल्लीभर बोंबलणारा कर्णी लाउडस्पीकर, अर्धवट चेहरे माखवणारी हळद, हळदीची तर्राट झालेली बेधुंद पार्टी, रात्री मांडवामध्येच रंगणारे पत्त्याचे डाव, विहीणबाईचा रुसवा फुगवा, मान-अपमाननाट्यात मोठ्या जावई माणसाने केलेला राडा, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे लागेल या भीतीने रात्रभर न झोपलेला मुलीचा बाप, ठरल्याप्रमाणे सगळं काही मिळालं तरी आणखी काही उकळता येईल का? असले राक्षसी विचार करीत कुंभकर्णासारखा झोपलेला व्याही, प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी पाहुण्यांनी भरलेला मांडव, अगदी ५ रुपयांच्याही रोख आहेराचे लाउडस्पीकरवरून होणारे जाहीर वाचन, गर्दीकडे बघून आनंदी असलेला, पण स्वयंपाक पुरेल का? या भीतीने पुन्हा एकदा वैतागलेला मुलीचा बाप, वरणात आणि वांग्या-बटाट्याच्या आमटीत पाणी ओतून ओतून थकलेला आचारी, बिदाईचा अस्सल मेलोड्रामा आणि शेवटी मांडवातलं आवरतांना भाड्याने आणलेले १० स्टीलचे ग्लास, २० चमचे, १५ वाट्या, ४-५ ताटं कमी भरतायंत म्हणून मांडवाचा कोपरा न कोपरा शोधणारा मुलीचा भाऊ आणि त्याची मित्रकंपनी.
आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे “लग्न पहावं करून”. या म्हणीची पार्श्वभूमी कदाचित या असल्या लग्नातील मुलीच्या कुटुंबाकडेच अंगुलीनिर्देश करते. आपल्याकडे लग्न म्हणजे सोहळा. नुसता साधासुधा सोहळा नाही तर असा सोहळा की ज्यात तुम्ही श्रीमंत असाल तर श्रीमंतीचा बडेजाव त्यात असलाच पाहिजे, मध्यमवर्गीय असाल तरी ‘ऋण काढून सण साजरा करतात’ तसा साजेसा लग्नसोहळा झालाच पाहिजे आणि गरीब असाल तरीही ‘घेणं एक अन् देणं दोन’, पण लगीन थाटात झालंच पाहिजे.
थोडक्यात कायं, तर लग्न हे खर्चिक असलं तरी आपल्याकडे जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चाललेलं असतानाच आता कोरोनाने या सगळ्या वाईट प्रथांच्या संक्रमणाला एक नवा आयाम देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. लोक काय म्हणतील? लोक नावं ठेवतील? काय करणार…खर्च करावाच लागेल, असे म्हणंत ‘होऊ दे खर्च’, या शब्दाला जागणारी लग्न आपण प्रत्येकानेच अनुभवली आहेत. परंतु आता कोरोना मात्र या खर्चिक विवाहसोहळ्यांना लगाम घालण्यासाठी एक जालीम उपाय घेऊन आला आहे असे म्हणायला सध्यातरी हरकत नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत कमी खर्चात विवाह संपन्न होऊ लागले आहेत. घरासमोरचे मांडव पुन्हा एकदा सजू लागले आहेत. घरातली मंडळी मांडवातून आपल्या इष्टमित्रांना फेसबुक लाइव्हसारख्या समाजमाध्यमांच्या सहाय्याने या लग्नसोहळ्यात सामावून घेऊ लागली आहे. लग्न खर्चात कैकपटीने कपात होते आहे ही यातली खूप मोठी जमेची बाब. असली मर्यादा ठेवून लागणारी लग्न अशीच लागत राहिली तर नुसता कोरोनाच थोपवून धरण्याइतपत यश मिळणार नाही तर कर्जाखाली वाकत चाललेली मुलीच्या बापाची पाठसुध्दा सरळ ठेवण्यात यश येणार आहे.
बदल घडवण्याची हीच नामी संधी नव्या पिढीला मात्र मोठ्या मनाने स्वीकारावी लागेल. यामुळे नुसता कोरोना थोपवून धरण्यात यश येईल, असे नाही तर लग्नसमारंभावर होणारा अतोनात खर्च कमी करून खिशाला होणारा क्षयरोगसुध्दा बरा करता येईल….!
मग काय तर, घ्या मनावर आणि वाजवा…घरासमोरच्या मांडवात. फक्त अस्मादिकाला लग्नाच्या फेसबुक लाइव्हची तिथी आणि लिंक नक्की पाठवा. शुभेच्छा आणि झाले शक्य तर आॕनलाइन आहेर नक्कीच पाठवतो.
जगदीश देवरे
७५८८०९७९१९
Thanks to all