मुस्लिम बांधवांनी घरातच केली बकरी ईद साजरी
नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी घरातच नमाजपठण करीत बकरी ईद साजरी केली. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, विजय खरात यांनी आपापल्या परिमंडळात शांतता समितीच्या बैठक घेत बकरी ईदनिमित्ताने सामूहिक नमाजपठण न करता घरातच नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहर-ए-खतीब आणि शहरातील धर्मगुरूंनी मुस्लिम बांधवांना घरात राहून नमाजपठण करण्याचे आवाहन केले. त्यामुळे कोणीही सामूहिक नमाजपठणसाठी ईदगाह मैदानावर आले नाही. दरवर्षी ईदगाह मैदानावर हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करतात यंदा मात्र खंड पडला आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता पोलीस व जिल्हा यंत्रणेने निर्णय घेतला होता आणि त्यास मुस्लिम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
तरीही जुने नाशिक, भद्रकाली, सिडको, सातपूर, नाशिकरोड या परिसरात दीड हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.