मुंबई – पीएफ धारकांची सर्वांत मोठी समस्या म्हणजे आपल्या खात्यात किती पैसा जमा आहे हे जाणून घेणे होय. बरेचदा पोर्टलची यंत्रणा संथगतीने काम करीत असल्यामुळे याचा त्रास होतो. पण केंद्र सरकारने जारी केलेल्या नंबरवर मिस कॉल दिल्यास तुम्हाला तातडीने मेसेजद्वारे याची माहिती प्राप्त होणार आहे.
केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी पीएफ खातेधारकांच्या खात्यात असलेल्या रकमेवर २०१९-२०चे व्याज जमा व्हायला सुरुवात झाली असल्याचीही माहिती दिली. यासंदर्भात अधिसूचनाही निघाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय भविष्य निधी कार्यालयाच्या या निर्णयामुळे सहा कोटींपेक्षा अधिक ईपीएफधारकांना लाभ होणार आहे.
‘२०२० मध्ये सर्वांसाठीच प्रतिकुल परिस्थिती होती. आम्ही २०२१ च्या सुरुवातीलाच ८.५ टक्के व्याज देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले होते. तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले होते. मात्र आम्ही ते वचन आता पूर्ण करीत आहोत.’ यावर्षी गंगवार यांच्या अध्यक्षतेतील केंद्रीय मंडळाने आर्थिक वर्ष २०१९-२० साठी ईपीएफवर ८.५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली होती. यापूर्वी सप्टेंबरमध्ये ईपीएफओने व्याजाची रक्कम दोन इन्स्टॉलमेंटमध्य देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर मंत्रालयाने पूर्ण रक्कम देण्याचा निर्णय घेतला. पण ही रक्कम जाणून घेण्याची समस्या मात्र कायमच होती. त्यावरही तोडगा काढण्यात आला आहे.
पीएफधारकांना आता एसएमएस किंवा मिस्ड कॉलच्या आधारावर तसेच उमंग एप व युएएन पोर्टलवरही पीएफ बॅलन्स तपासता येणार आहे. तसेच ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊनही बॅलन्स तपासता येणार आहे.