गाझियाबाद – शहरातील एका उच्चभ्रु भागात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दोघा चोरट्यांनी दुचाकीवर येऊन एका व्यावसायिकाची पत्नी आणि मुलगा यांना घरात बांधून ठेवले. तसेच सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने लुटले. विशेष म्हणजे, या घरफोडीस विरोध करणाऱ्या १२ वर्षीय मुलाचे तोंड चोरट्यांनी चक्क फेविक्वीकने चिपकवल्याची बाब समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर राहणारे प्रवीण सिंघल यांचे दुकान आहे. त्यांना पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. सायंकाळी सातच्या सुमारास प्रवीण सिंघल दुकानात होते. मुलगी शिकवणीला गेली होती, तर पत्नी शालिनी आणि १२ वर्षाचा मुलगा प्रभाव हे दोघे घरी होते. यावेळी कोणीतरी डोरबेल वाजविली. त्यावेळी शालिनी दार उघडले तेव्हा हेल्मेट परिधान केलेली एक तरुण बाहेर उभे असल्याचे तिला आढळले. शालिनीने गेट उघडताच तरूणाने तिला ढकलले व आत जाण्यास सांगितले. तिला काही समजण्याआधीच आणखी एक चोरटा आला आणि त्याने तिला धमकावले. यानंतर त्यांनी घरातील मौल्यवान वस्तूची चौकशी केली.
घरफोडी करणाऱ्यांनी सुमारे अर्धा तास घरात सामानाची फेकाफेक केली. तसेच वेब कॅमेरा आणि सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर काढून घेतला. शालिनी आणि प्रभाव यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलाने वायपरने चोरट्यांवर हल्ला केला.
यावेळी त्यांनी या मुलाला पकडले आणि त्याच्या ओठांवर फॅविकविक लावले. याद्वारे त्यांनी त्याचे तोंड चिपकविण्याचा प्रयत्न केला. त्याला आईसह आतल्या खोलीत बंदिस्त केले. यानंतर सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज लूटून बदमाशांनी तेथून पळ काढला. यानंतर प्रवीणने रात्री साडेआठच्या सुमारास घरी फोन लावला, मात्र फोन लागत नाही म्हणून त्याने जाऊन पाहिले तेव्हा त्याला बायको आणि मुलगा खोलीत बंद असल्याचे आढळले. व्यावसायिकाने अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. नागरिक आणि पोलीस या घटनेत मुलाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.