नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे नाशिकमध्ये घरघुती सिलेंडर ग्राहकांना १४.२ किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी ७९८ रुपये मोजावे लागणार आहे. या अगोदर ही किंमत ७७३ होती. गेल्या तीन महिन्यांचा विचार केला तर एकूण २०० रुपयांची ही वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये संताप आहे.
विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ही तिसऱ्यांदा सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे पेट्रोल – डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे अगोदरच संताप असतांना ही वाढ झाली आहे. कोरोनामुळे अद्यापही व्यवहार सुरळीत सुरु झालेले नाही. त्यात सरकार विविध किंमतीत वाढ करत आहे. त्यामुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. एलपीजीच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रोपेन आणि ब्युटेन यांच्या किंमतीवर तसेच डॉलर आणि रुपयाच्या एक्सचेन्ज रेटवर अवलंबून असते त्यात वाढ झाली की वाढ होत असते. पण, सरकार मात्र किंमतीवर नियंत्रण ठेवत असते. पण, आता या भाववाढीवर सरकारने कोणताच दिलासा दिलेला नाही.