नाशिक – शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि दाट वस्तीच्या जुने नाशिक आणि द्वारका परिसरातील वडाळा नाका भागात इगतपुरी चाळीत काल मध्यरात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोटातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अन्य ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिलेंडर स्फोटात सय्यद लियाकत रहीम (वय ३२) सय्यद नुसरद रहीम (वय २५), रमजान वलीउल्ला अन्सारी (वय २२), सोहेब वलीउल्ला अन्सारी (वय २८), शरीफ सलीम अत्तर (वय ५३), नसरीन नुसरत सय्यद (वय २५), सहिदा शरफोद्दीन सय्यद (वय ४९), मुस्कान वलीउल्ला अन्सारी (वय 21) सर्व राहणार – संजरीनगर, इगतपुरी चाळ, वडाळा नाका हे सर्व जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या जखमींपैकी नसरीन नुसरत सय्यद (वय २५) आणि सहिदा शरफोद्दीन सय्यद (वय ४९) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी (२ एप्रिल) रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने पाच पुरुष आणि तीन महिला जखमी झाले होते. यापैकी पाच जण गंभीर जखमी झाले. गॅस सिलेंडरचा स्फोट इतका मोठा होता की, या स्फोटाच्या आवाजाने रात्री आजूबाजूच्या परिसरातील घरांमध्ये आणि चाळीमध्ये झोपलेले लोक जागी झाले.
दुर्घटना झालेल्या घरामधून धूर निघत असल्याचे बघताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन आपदग्रस्तांना मदत केली. यात सामाजिक कार्यकर्ते रिजवान नसीस खान आणि त्यांचे सहकारी व मित्र परिवार यांनी सर्व जखमींना तातडीने उपचारार्थ साठी रुग्णालयात जाण्याची व्यवस्था केली. या स्फोटामुळे घरातील संसारोपयोगी सामानाचे देखील नुकसान झाले.