नाशिक – सुपरवायझरच्या जाचामुळे घंटागाडी कामगार दहशतीच्या छायेत असल्याचा आरोप नाशिक महापालिका श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी केली आहे. याची त्वरित दखल घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
खुडे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,घंटागाडी ठेकेदार योगेश गाडेकर हे नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी नेमलेला नवा सुपरवायजर हा कामगांरामध्ये दहशत निर्माण करीत आहे. काम नाकारणे किंवा मानसिक त्रास देणे अशा प्रकारचे काम सध्या सुरू आहे. तसेच, घंटागाडी कामगारांना किमान वेतन पुरेसे व वेळेवर देण्यात येत नाही. क्वारंटाइन केलेल्या कामगारांना त्या दिवसाचे वेतन मिळत नाही. पीएफ न भरणे, २१ दिवसांच्या भरपगारी रजेचे थकीत वेतन न मिळणे, अत्यावश्यक सुविधा मास्क, हातमोजे, गमबूट, पाणी, हात धुवायला साबण, सॅनिटायझर आदीही मिळत नाही. असे असताना कामगारांनी सनदशीर मार्गाने यासंदर्भात पाठपुरावा करू नये म्हणून दहशत माजविली जात असल्याचे खुडे यांनी म्हटले आहे. या सुपरवायझरला तत्काळ बाजूला करावे, यासाठी कामगारांनी पंचवटी भागात काम करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. यावर कार्यवाही न झाल्यास सिडको व नाशिक रोड भागातील कामगारही काम करण्यास असमर्थता व्यक्त करतील, असा इशाराही खुडे यांनी दिला आहे.