नाशिक – घंटागाडी कर्मचाऱ्याच्या मृत्यूस जबाबदार ठेकेदार व सुपरवायझरवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरत मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने जिल्हारूग्णालय आवारात तणाव निर्माण झाला होता.
केशव साळवे या घंटागाडी कामगाराचा सेवा बजावत असतांना मृत्यु झाला. शुक्रवारी (दि.२६) साळवे कुटूंबिय शवविच्छेदन झालेला मृतदेह घेण्यासाठी जिल्हारूग्णालयात आले असता ही घटना घडली. यावेळी ठेकेदाराच्या मानसिक जाचामुळे केशव साळवे यांचा मृत्यु झाल्याचा आरोप करण्यात आल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
ठेकेदारासह सुपरवायझरवर गुन्हा दाखल करावा या मागणी साठी दिवसभर ठिय्या दिला. या आंदोलनात मनपाच्या श्रमिक संघाने सहभाग नोंदविल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. सायंकाळी पोलिसांनी जाबजबाब घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने या वादावर पडदा पडला.