निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवून आहे ते जपणं आणि हवंय ते देणं हिच पर्यटन विकासाची खरी संकल्पना
: मुख्यमंत्री ठाकरे
नाशिक – पर्यटन वाढीसोबत विकासाच्या हव्यासापोटी आपलं पर्यावरण नष्ट न करता आहे त्या स्थितीत त्याचा विकास करण्याची आवश्यकता आहे, तसेच आहे ते जपणं आणि हवंय ते देणं हिच पर्यटन विकासाची खरी संकल्पना असावी, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन डेटा बँकचे विमोचन तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक व खारघर येथील दोन पर्यटक संकुलांचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शुभहस्ते ई-लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीपराव बनकर, माजी खासदार समीर भुजबळ, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, जिल्हाध्कारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदिश चव्हाण शाखा अभियंता महेश बागुल, सागर शिंदे आदी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सन २०१३ साली छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक मध्ये मेगा पर्यटन संकुलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने काढलेली डेटा पुस्तिका हे एक राज्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टिने महत्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्राला अनेक गडकिल्यांचा वारसा मिळालेला आहे. त्याची जपवणूक करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. नाशिक बोट क्लबचा पूर्ण क्षमतेने विकास व्हावा व पर्यटन आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. वन्य प्राणी, सूक्ष्मजीव हा आपल्या राज्याचा ठेवा असून ते मोठं वैभव आहे, त्याची जपणूक करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करणे हेच आजच्या जागतिक पर्यटन दिनाचे खरे औचित्य ठरेल असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
मुंबईतील गिल्बर्ट हिलवर बाराव्या शतकातील मंदिर असून या टेकडीचे वैशिष्ट्ये म्हणजे ती ज्या खडकापासून बनली आहे तशा तशा खडकातल्या जगात केवळ दोनच टेकड्या आहेत. एक मुंबईतील अंधेरीच्या बाजूची आणि दुसरी अमेरिकेतील. दोघांचा दगड एक आहे. पण अमेरिकेने या वास्तूची जपणूक वर्ल्ड हेरिटेज म्हणून केली आहे. आपलेही अशा ठेव्यांची जपणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाने पर्यटन विभागाच्या विकासासाठी पहिला निधी रायगडासाठी ६०० कोटीच्या रुपात मंजूर केला. त्यातील २० कोटी निधी वितरीतही केला आहे. गेल्या काही दिवसात या खात्याने चांगले काम केले आहे. पर्यटनाचा विकास करतांना राहण्याची खाण्याची, पोहोचण्याची उत्तम, सोय असायला हवी. यासाठी पर्यटनाचे एक स्वतंत्र पॅकेज करण्याबाबतची सूचनाही यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मंत्रभूमी, यंत्रभूमी आता पर्यटन भूमी म्हणूनही ओळखली जाईल : छगन भुजबळ
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहर व जिल्ह्याला मोठी धार्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. आज नाशिकची वाटचाल मंत्र भूमीकडून यंत्र भूमीकडे होत असतांना नाशिकमध्ये बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना नाशिकमध्ये आल्यावर किमान दोन तीन दिवस वास्तव्य करावे या हेतून शहर व जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या सौंदर्यात भर पडणारी व पर्यटन केंद्रांचा अमुलाग्र विकास साधणारी मोठ्या प्रमाणात पर्यटन विकासची कामे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात लवकरच बोट क्लबचा प्रकल्प सुरु केला जाईल हा राज्यातला एक नंबरचा बोट क्लब असणार आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीने साहसी क्रीडा केंद्र, कन्व्हेन्शन सेंटरसह कलाग्राम तसेच तयार असलेले अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट देखील लवकरच सुरु करण्यात येईल. यापुढील काळात नाशिक शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले इगतपुरी येथे हिल स्टेशन विकसित करणे, दादासाहेब फाळके चित्रपट नगरीचा विकास, श्री संत निवृत्ती देवस्थान विकास आराखडा, श्री सप्तशृंगी गड विकास आराखडा, भावली धरण येथील पर्यटन विकास, ओझरखेड धरण येथील पर्यटन विकास, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, येवला तालुक्यातील ममदापूर येथील वन पर्यटन क्षेत्राचा विकास करून पर्यटनाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री भुजबळ पुढे म्हणाले, रायगडाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ही कामे तातडीने हाती घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. भविष्यात जास्तीत जास्त पर्यटक महाराष्ट्रात खेचून आणण्यास प्रयत्न करण्यात येतील.
ग्रेप पार्क रिसॉर्टमुळे नाशिकच्या वैभवात भर: जिल्हाधिकारी सूरज मांढरे
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, पर्यटनाच्या दृष्टीने आज ही देणगी खुली होत आहे. ग्रेप पार्क रिसॉर्टमुळे नाशिकच्या वैभवात भर पडणार आहे. देशातील हे महत्वाचं पर्यटनस्थळ ठरेल. या वास्तूचा चांगला उपयोग कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे त्यांनी यावेळी सांगितले.