ग्राहक जागृती: काळाची गरज
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांनी १५ मार्च १९६२ रोजी काँग्रेसला उद्देशून एक खास संदेश
दिला. या संदेशाद्वारेच ग्राहक हक्क चळवळीची बीजे रोवली गेली. त्यामुळे हा दिवस ग्राहक हक्क दिवस म्हणून
साजरा केला जातो. चांगली वस्तू किंवा सेवा मिळविण्याचा आणि तसे घडले नाही तर दाद मागण्याचा ग्राहक
म्हणून प्रत्येकाला अधिकार आहे. या अधिकाराचे रक्षण व्हावे, त्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून या
दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी जागतिक स्तरावर ग्राहक हक्काशी निगडीत एका पैलूवर यानिमित्ताने चर्चा
घडवून आणली जाते.
ग्राहक हक्क दिवसाच्या निमित्ताने आतापर्यंत स्मार्ट उत्पादने, डिजीटल मार्केटींग, प्रतिजैविके, पौष्टिक
आहार, मोबाईल वापराबाबत अधिकार आदी विविध विषयांवर जागृती करण्यात आली आहे. यावर्षी
प्लास्टिकचा उपयोग टाळण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. एका अंदाजानुसार २०५० पर्यंत
महासांगरांमध्ये माशांपेक्षा प्लास्टिक अधिक असेल. दरवर्षी १ लाख कासव आणि इतर समुद्री जीव तसेच १०
लाख समुद्री पक्षी समुद्रातील प्लास्टिकमुळे जीव गमावतात. दरवर्षी ८ दशलक्ष टन प्लास्टिक समुद्रात जाते.
केवळ एक वेळ वापरण्यायोग्य प्लास्टिकचे प्रमाण ५० टक्क्यापेक्षा अधिक आहे. ४० टक्के प्लास्टिकचा
वापर हा केवळ आवेष्टनासाठी होत असल्याने वापरानंतर ते फेकून दिले जाते. एका पाहणीनुसार भारतात
२०१८-१९ मध्ये १८ दशलक्ष टन प्लास्टिकचा उपयोग करण्यात आला. दरवर्षी प्लास्टिक कचरा वाढण्याची
भितीही व्यक्त होत आहे.
प्लास्टिकचा शोध मानवी जीवनाच्यादृष्टीने महत्वाचा वाटत होता. त्याच्या गुणवैशिष्ठ्यामुळे त्याचा
दैनंदिन जीवनात वापर वाढत गेला. मात्र त्याचवेळी एकवेळ वापरण्यायोग्य (सिंगल युज) प्लास्टिकचा
वापरही वाढला आणि प्रदूषण वाढण्यास सुरूवात झाली. जागृती अभावी शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची
समस्या निर्माण होऊ लागली आहे. अशावेळी सर्व मिळून प्लास्टिकचा उपयोग कमी करण्याची गरज आहे.
प्लास्टिकच्या वस्तुंचा पुर्नवापर, प्लास्टिक आवेष्टण असलेल्या वस्तू टाळणे, प्लास्टिक वापराबाबत पुर्नविचार,
अशा वस्तू दुरुस्ती करून वापरणे, वापर कमी करणे, पर्यायी वस्तूंचा वापर याद्वारे सामान्य नागरिकालाही
आपले योगदान देता येईल.
एक ग्राहक म्हणून प्रत्येकाला गरजांची पूर्ती करणाऱ्या वस्तू किंवा सेवा, अन्न, वस्त्र , निवारा, शिक्षण
आणि आरोग्य सुविधा,पाणी, सार्वजनिक सुविधा मिळविण्याचा हक्क असतो. तसेच वस्तू किंवा सेवा घेताना
त्यापासून संरक्षण मिळविण्याचा, दाद मागण्याचा, चांगल्या पर्यावरणाचा, जाणून घेण्याचा आणि निवड
करण्याचाही हक्क असतो. संयुक्त राष्ट्रांच्या ग्राहक संरक्षणाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांमध्येदेखील या बाबींचा
समावेश करण्यात आला आहे. चांगले पर्यावरण, प्रदूषणमुक्त परिसंस्था, शुद्ध पाणी, आहार साखळीदेखील याचाच एक भाग आहे. प्लास्टिकमुळे या सर्व घटकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने त्याच्या वापराबाबत समाजात जागरूकता
2
निर्माण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. एक ग्राहक म्हणूनदेखील आपण प्लास्टिकचा कमी वापर न करण्याचा
निश्चय करणेही महत्वाचे आहे. लोकशाही प्रणालीत ग्राहकराजा असा शब्दप्रयोग केला जातो. जगातील सर्व उत्पादने आणि सेवा उद्योग हे ग्राहकासाठीच उत्पन्न केले जातात. ग्राहक त्यांचा उपभोग घेतो म्हणूनच अर्थव्यवहाराचे चक्र फिरते राहते. ग्राहका अभावी सर्व व्यवहार निरर्थक ठरतील. त्याचप्रमाणे नागरिक हा एकाचवेळी मतदार आणि ग्राहकदेखील असतो. मतदारजागृतीद्वारे प्रगल्भ लोकतंत्र उभे राहते त्याचप्रमाणे ग्राहक जागृतीद्वारे सशक्त अर्थव्यवस्थेची निर्मिती करता येते. त्यामुळे विकासाच्या वाटेवर पुढे जाताना ग्राहक जागृती अत्यंत आवश्यक आहे. जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणारे नवे संकट टाळण्यासाठी ग्राहकांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे. अशा समस्यांविषयी ग्राहकांची एकजूट आणि अधिकाराविषयीची जागरूकता अत्यंत आवश्यक आहे. जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयेाजन केले जाते. अशा उपक्रमात आपणही सहभागी होऊन ग्राहक हक्काची ही चळवळ अधिक मजबूत करू या !
-जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार