नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त लोकांना आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, तसेच ग्रामीण भागातील सोनोग्राफी कक्षाची वैद्यकीय अधीक्षकांमार्फत तपासणी करण्यात यावी, अशा सूचना बैठकीच्या अध्यक्ष डॉ. किरण पाटोळे यांनी दिल्या.
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियम सल्लागार समितीच्या दृकश्राव्य बैठकीत ते बोलत होते. यावेळी दृकश्राव्य परिषदेत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जनुकीय विशेषज्ञ डॉ. ज्ञानदेव चोपडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. पंकज गाजरे, श्रीमती मानसी देशमुख, श्रीमती अॅड. सुवर्णा शेफाळ, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायदातज्ञ अॅड. माने तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीमध्ये जिल्ह्यातील मुले आणि मुली यांचे लिंगगुणोत्तर वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यासोबतच गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत ग्रामीण भागात झालेल्या कोर्ट केसेसवर चर्चा करण्यात येवून त्या केसेस संदर्भात ॲड. शेफाली यांनी शासनाची बाजू मांडण्याबाबत माहिती सादर केली.
त्र्यंबक, वणीतील सोनोग्राफी केंद्रांना मान्यता
या बैठकीत त्र्यंबकेश्वर येथील फुलपगारे मॅटरनिटी क्लिनिक, वणी तालुका दिंडोरी मधील श्रीजा सोनोग्राफी सेंटर या नवीन सोनोग्राफी केंद्रास मान्यता देण्यात आली. तसेच येवला तालुक्यातील नानावाटी क्लिनिक या केंद्रातील सोनोग्राफी मशिन सांगली येथे स्थलांतरीत करण्यास परवानगी देण्यात आली. ओझरमिग येथील एच.ए.एल. हॉस्पिटल येथे अतिरिक्त रेडिओलॉजिस्ट यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी मंजुरी देण्यात आली.
चांदवडचे केंद्र कायमचे बंद
चांदवड तालुक्यातील श्रीमती के.बी. आवड होमिओपॅथी महाविद्यालय नेमीनगर येथील सोनोग्राफी केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. निफाड येथील एनएचएम हार्ट केअर सेंटर येथे जी. व्ही. राव यांचे २ डी इको मशिन खरेदी, येवला येथील चंडालिया हॉस्पीटल ॲन्ड मॅटरनिटी होम सोनोग्राफी केंद्राचे नुतनीकरण, इगतपुरी येथील वैद्यकीय अधिक्षक एस.एम.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालयात नवीन सोनोग्राफी मशिन घेणे व अतिरिक्त रेडिओलॉजिस्ट डॉ. योगेश हसमुखभाई सेंघानी यांना १८ जानेवारी २०२१ पर्यंत नूतनीकरण करण्यात आले आहे.
यापुढे त्रैमासिक आढावा
नवीन सोनोग्राफी सेंटर प्रस्ताव, नूतनीकरण प्रस्ताव, अतिरिक्त मशीन व सोनोलॉजिस्ट नेमणूक, जिल्ह्यातील न्यायालयीन प्रकरणांचा सविस्तर आढावा, न्यायालयीन प्रकरणांची सद्यस्थिती यांवर चर्चा झाली. सोनोग्राफी विषयक बाबींचा त्रैमासिक आढावा देखील यावेळी घेण्यात आला.
यांना नुतनीकरणाची परवानगी
जगदंबा सोनोग्राफी सेंटर दिंडोरी येथे स्थलांतरीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सटाणा येथील पवार सोनोग्राफी क्लिनिक, निफाड तालुक्यातील नैताळे येथील प्रथमेश हॉस्पिटल, दिंडोरी येथील श्रद्धा डायग्नोस्टिक सेंटर या सोनोग्राफी केंद्राना नुतनीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. सदर सर्व प्रस्तावांना या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, असेही डॉ. अनंत पवार यांनी सांगितले आहे.