नाशिक – ग्रामीण भागातील कोविड रूग्णांवर उपचार करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य कार्यालयाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांना समर्पित कोविड आरोग्य केंद्रे (डीसीएचसी) चालविण्यास परवाणगी दिली आहे.
जिल्ह्यातील १o ठिकाणे खासगी रुग्णालयांना डीसीएचसी सुरू करण्याची परवाणगी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना जास्तीची काळजी घ्यावी लागेल अशा रुग्णांना या केंद्रांमध्ये पाठवले जाऊ शकते. जिल्ह्यात यापूर्वीच सुमारे १५ ठिकाणी शासन संचालित डीसीएचसी केंद्रे आहेत. यापैकी काही केंद्रांवर विस्तार प्रस्तावित करण्यात आला आहे किंवा पूर्ण झाला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले की, “सध्या खासगी आस्थापनांच्या डीसीएचसीमध्ये उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातून शहर परिसरात येणाऱ्या रूग्णांचा ओघ खूपच जास्त आहे, ज्याचा परिणाम नाशिक शहरातील किंवा अगदी मालेगावमधील रूग्णांवर होणाऱ्या उपचारांवर होत आहे. ग्रामीण भागातील खासगी डीसीएचसी या दोन्ही शहरांमधील आरोग्य सुविधांवर येणारा भार कमी करण्यासाठी उपयोग होईल.
तसेच सध्या सिन्नर तालुक्यातील सिन्नर शहरात दोन खासगी डीसीएचसी कार्यरत आहेत. याशिवाय सटाणा , पिंपळगाव , ओझर, विंचूर , ओढा येथे डीसीएचसी होत आहे. नाशिक तालुका आणि इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील २० बेडच्या डीसीएचसीला कामकाजासाठी मान्यता मिळाली आहे. शिवाय, मालेगाव तालुक्यातील दिंडोरी व मनमाड शहरातही मंजुरी मिळण्याच्या टप्प्यात असलेल्या डीसीएचसी प्रस्तावित असल्याचे डॅा. आहेर यांनी सांगितले.