नाशिक – कोविड-१९ च्या नियंत्रणासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोंबर या कालावधीत दोन टप्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामोहिमेत जिल्हयातील ४१ लक्ष ६३ हजार २१५ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून दोन्ही टप्प्यात ४५४४ इतके रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांव्दारे जनजागृती करत जिल्हयात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात आली. जिल्हयात एकुण ९ नगरपरिषदा, १३८५ ग्रामपंचायती व १७१३ गावांमध्ये दोन टप्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण केले. आशाताई, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांनी या मोहिमेत महत्वाचे योगदान दिले. सर्वेक्षण करणा-या पथकांनी जिल्हयातील ग्रामीण भागातील ४१ लक्ष ६३ हजार २१५ लोकांचे तर ८ लक्ष ५६ हजार ४९६ कुटुंबांचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले. या मोहिमेत एकुण १६३१४ रुग्णांना संदर्भीत करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्यात ३८३९ तर दुस-या टप्यात ७०५ असे एकुण ४५४४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच कोमॉरबिड (सहव्याधी) रुग्णांची संख्या दोन्ही टप्यात मिळून २ लक्ष ९ हजार ६५९ इतकी आढळून आली.
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यासाठी तालुका पातळीवर प्रातांधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी, नगरपरिषेदेचे मुख्याधिकारी यांनी समन्वय साधून मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले. अभिनेता अभिजित खांडकेकर, अभिनेत्री अनिता दाते यांनीदेखील या मोहिमेमध्ये सहभागी होऊन नागरिकांना आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले. गावोगावी मोहिमेसाठी जनजागृतीपर बॅनर्स तसेच भिंतीवर संदेश, लोगो काढण्यात आले. टोपी, टी शर्ट, स्टिकर्स या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी तालुक्यांना तसेच ग्रामपंचायतींना भेटी देऊन मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी परिश्रम घेतले.
मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद – लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचे दोन्ही टप्पे जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यात आले. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिका-यांचे पर्यवेक्षण, लोकप्रतिनिधींनी केलेले आवाहन, सर्वेक्षण पथकांनी गृहभेटी करुन केलेली तपासणी, मोहिमेबाबत विविध माध्यमातून झालेली जनजागृती यामुळे मोहिम यशस्वीपणे राबविता आली. जिल्हा परिषदेचे पदाधिका-यांनीही नागरिकांना आवाहन करुन यात सहभाग घेतला. जिल्हयामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढेही कोविडमुक्त जिल्हा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे तसेच दिवाळीच्या काळामध्ये सर्वांनी खबरदारी घेवून, कोरोनाच्या नियमांचे पालन करुन दिवाळी साजरी करावी.