नाशिक – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी शिक्षण विभाग सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नाला आधुनिकतेची जोड देऊन दूरचित्रवाणीच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे घरोघरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हाधिकारी यांचे दालनात झालेल्या या बैठकीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजीव म्हसकर, डेन वाहिनीचे व्यवस्थापक रोहित आरोळे यांसह जिल्ह्यातील विविध केबल चालकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी श्री मांढरे म्हणाले, जिल्हा परिषद शिक्षण विभाग ग्रामीण भागातील मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचवण्यासाठी कंबर कसून प्रयत्न करीत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना टॅबलेट अथवा मोबाईल संच देखील लोकांच्या माध्यमातून व विविध संस्थांच्या माध्यमातून पुरवण्यात येत आहेत. याच मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून यामध्ये दूरचित्रवाणी द्वारे शिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू करण्याची कल्पना मनात आली व त्याला जिल्ह्यातील केबलचालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. जिल्हा परिषदेने यापूर्वी तयार केलेला अभ्यासक्रम व मल्टीमीडिया कन्टेन्ट जिल्ह्यातील केबल चालक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांपर्यंत दूरचित्रवाणीद्वारे 24 तास वाहिनी करून पोहोचवण्याचे बैठकीत ठरले. सर्वप्रथम इयत्ता पहिली ते आठवी या शैक्षणिक वर्षातील मुलांचा विचार करून त्यांना दूरचित्रवाणीद्वारे अभ्यासक्रमातील कोणता घटक प्रामुख्याने शिकविला जावा जिल्हापरिषदेच्या स्तरावर शिक्षण विभागातील जाणकारांची समिती गठित करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर शिक्षकांनी करावा. सोबतच जर विद्यार्थ्यांना काही कारणास्तव विशिष्ठ वेळेत अभ्यासवर्गासाठी उपस्थित राहता आले नाही तर त्यासाठी मुद्रित केलेले चलतचित्रण युट्युबवर अपलोड करून कायमस्वरूपी बघता येण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी चर्चेत सहभाग घेतांना या उपक्रमासाठी लागणारी सर्व माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिली जाईल. सध्या काम करत असताना जिल्ह्यातील शिक्षकांनी जे चलतचित्र यापूर्वी बनविले आहे त्याचाही वापर यासाठी करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शिक्षण विभागातर्फे अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवून या उपक्रमाचे केबलचालकांच्या समन्वयातून नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.