नाशिक : चोरी गेलेल्या मौल्यवान वस्तू असो किंवा दागिणे ते पुन्हा मिळतीलच याची काही शास्वती नसते, पोलीसांकडून तपास केला जातो मात्र तपास कधी पूर्ण होईल आणि चोरीस गेलेल्या वस्तू कधी पुन्हा हाती पडतील हे सांगता येत नाही. ग्रामिण पोलीसांनी मात्र याबाबत नागरीकांचा विश्वास सार्थ ठरवून सुमारे १२ लाख १० हजार ६०७ रूपयाचा मुद्देमाल संबधीत फिर्यांदीच्या स्वाधीन केला.
पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी पदभार स्विकारताच ग्रामिण भागातील चो-या आणि घरफोड्यांचा तपासाचा आढावा घेवून पोलीस ठाणे निहाय गुह्यांचा उलगडा करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार जिह्यातील विविध पोलीस ठाणे निहाय दाखल असलेल्या दागिणे,वाहन,मोबाईल,रोख रक्कम चोरीच्या गुह्यांचा तपास पूर्ण करीत पोलीसांनी हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली. हा मुद्देमाल गुरूवारी (दि.७) मुळ मालकांना परत करण्यात आला. आडगाव येथील मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर व अधिक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थित मुद्देमाल मुळ मालकांना वितरीत करण्यात आला. याप्रसंगी चोरीस गेलेल्या वस्तू पुन्हा हातात पडल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. तर पोलीसांच्या वतीने बाहेरगावी जातांना विशेष काळजी घ्यावी,दागिणे आणि पैसे बँकेत ठेवावे,बाहेर जातांना शेजा-यांना कल्पना द्यावी,शक्य असल्यास सीसीटिव्ही यंत्रणा कार्यन्वित करावी तसेच मालमत्ता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेवून पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अप्पर अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधिक्षक शामकुमार निपुंगे, निफाड विभागाचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थीत होते.