जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कामकाज ऑनलाईन
…
दिंडोरी: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज १ ऑगस्ट २०२० पासून ऑनलाईन सुरू झालेले आहे. तेव्हा ग्रामपंचायत मधील राखीव जागांवर उमेदवारी करणाऱ्यांनी जातवैधता प्रमाणपत्रांसाठी www.bartievalidity. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत. असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक माधव वाघ यांनी आवाहन केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील १४२३४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. यात नाशिकमधील ६२१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज महासंचालक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या नियंत्रणाखाली चालते. समितीच्या CCVIS-II प्रणालीत सर्व प्रकरणांचे सेवाशूल्क Live Online Payment Gateway या माध्यमातून ऑनलाईन भरण्यास १४ डिसेंबर २०२० पासून सुरूवात झालेली आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमधील ग्रामपंचायत निवडणुकीमधील कामकाजाबरोबरच शैक्षणिक, सेवा, निवडणूक व इतर सर्व बाबींचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्जांचा भरणा केल्यानंतर मूळ व प्रमाणित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे.त्यानंतर परिपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जमा करावी. असे जाहीर आवाहन माधव वाघ यांनी केले आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अशा सूचना ही दिल्या आहेत.