नाशिक – देवळाली मतदासंघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी दिलेल्या अनोख्या ऑफरची सध्या जबरदस्त चर्चा आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि २५ लाख रुपये मिळवा, अशी खुली ऑफर त्यांनी दिली आहे.
म्हणून दिली ऑफर
सरोज अहिरे यांनी सांगितले आहे की, कोरोना संकटकाळात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. निवडणुकांच्या काळात कोरोना महामारी संकट अधिक बळावू नये, देवळाली मतदार संघातील गावागावांत ग्राम पंचायत या स्थानिक निवडणूकांत ईर्षा, चुरस, स्पर्धा निर्माण होते. हे राजकारण कधीकधी टोकाची भूमिका घेते. नात्यागोत्यांत दुरावा, दुश्मनी निर्माण होते. यातुन कुटुंबातील व्यक्ती एकमेकांसमोर निवडणूक रिंगणात उतरतात. त्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होतात. कुटुंब राजकारणात होरपळले जाते. यासगळ्या बाबी टाळण्यासाठी गावातील शांतता, ऐक्य, समंजसपणा कायम टिकून राहून गावाचा विकास व्हावा. आपापसात मतभेद होऊ नये, तसेच कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावरही निवडणुकांचा ताण पडू नये यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होणे काळाची गरज आहे. असे स्पष्ट मत आ. सरोज बाबुलाल आहिरे यांनी व्यक्त केले आहे.
असे मिळणार पैसे
अहिरे यांनी सांगितले आहे की, या निवडणुकांमुळे मने दुभंगली जातात, उमेदवारांचे आर्थिक नुकसानही होते. निवडणूक घेण्यासाठी प्रशासनाचा वेळ व खर्च वाया जातो. म्हणून माझ्या मतदार संघातील या निवडणुका जी गावे बिनविरोध पार पाडतील त्या गावांना माझ्या आमदार निधीतून व इतर निधीतून २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देईन. तेव्हा सुज्ञ ग्रामस्थांनी सामंजस्याने विचार करा प्रशासनाला सहकार्य करा आणि गावातील एकोपा वृद्धिंगत करा अशी माझी मनोधारणा आहे, असेही आहिरे यांनी सांगितले आहे.