मुंबई – राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. त्यातील आतापर्यंतचे महत्त्वाचे निकाल असे
—
- सातारा – खासदार उदयनराजे यांना मोठा धक्क बसला आहे. त्यांनी कोंडवे हे गाव दत्तक घेतले आङे. मात्र, या गावाच्या निवडणुकीत उदयनराजे यांच्या पॅनलला अवघ्या ३ जागांवर यश मिळाले आहे.
- कल्याण – तालुक्यातील सांगोडे कोंढारी गावात अतिशय चुरशीची लढत. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवाराला सारखीच मते मिळाली. अखेर चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित करण्यात आला. त्यानुसार येथे शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.
- पुणे – अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील हे आहेत. मात्र, माढा तालुक्यातील कुर्डु ग्रामपंचायत निवडणुकीत पाटील हे पराभूत झाले आहेत.
- पुणे – कोरेगाव भीमा या संवेदनशील गावात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार अशोक पवार यांनी जय मल्हार पॅनलला पुरस्कृत केले होते. या ठिकाणी पॅनलच्या ११ जागा निवडून आल्या आहेत.
- जळगाव – जिल्ह्यातील भादली या ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीय पंथीय उमेदवार अंजली पाटील यांचा विजय झाला आहे. त्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीय पंथीय विजयी उमेदवार आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. मात्र, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्यांची उमेदवारी कायम राहिली आणि आज त्यांचा विजय झाला आहे.
- सोलापूर – अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील गटाचेच वर्चस्व. १७ पैकी १४ जागा जिंकल्या. विजयसिंह यांचे पुतणे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा मात्र पराभव झाला आहे. माळशिरमध्येही ४४ पैकी ३५ ग्रामपंचायतींवर विजयसिंह मोहिते पाटील यांचा वरचष्मा राहिला आहे.
- परळी – धनंजय मुंडे यांचा दबदबा कायम. एकूण १२ पैकी १० ग्रामपंचायतीत वर्चस्व
- औरंगाबाद – एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा मोठा दावा. ग्रामपंचायतींमध्ये एमआयएमचे तब्बल ६५ उमेदवार विजयी
- नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना चक्क भावानेच दिला मोठा धक्का. सिन्नर तालुक्यातील सोमठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार कोकाटे यांचे पॅनल पराभूत. भाऊ भरत कोकाटे याने दिली मात. आमदार कोकाटेंच्या पॅनलला अवघ्या ४ जागा तर भाऊ भरत यांच्या पॅनलला ७ जागा
- यवतमाळ – पुसद तालुक्यातील गहुली गावात प्रथमच झाली निवडणूक. सातही जागांवर भाजपचा विजय. भाजप आमदार नियल नाईक यांचा वरचष्मा. गहुली गाव हे राज्याची दोन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांचे गाव आहे. या गावात १९४९ नंतर प्रथमच निवडणूक झाली. मधल्या काळात येथे कायम बिनविरोध निवडणुका झाल्या.
- बारामती – सर्वच्या सर्व ४९ जागा जिंकण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एखदा सिद्ध
-
नागपूर जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतींपैकी ६५ ग्रामपंचायतींमधे भाजपानं बहुमत मिळवलं आहे. तर, ८ ग्रामपंचायतींमधे भाजपा समर्थित अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अशा एकूण ७३ ग्रामपंचायतीमधे भाजपानं विजय संपादन केला आहे.
-
काटोल विधानसभा मतदार संघात काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यांमधल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटानं एकहाती विजय मिळवल्यानं काटोल मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं आहे. काटोल तालुक्यातील तिनही ग्रामपंचायतीवर तर, नरखेड तालुक्यातल्या १७ पैकी १६ ग्रामपंचायतींमधे अनिल देशमुख गटानं विजय मिळवला आहे. नागपूर तालुक्यातल्या बाजारगाव सर्कलमधल्या पेठ ग्रामपंचायतीत सर्वच्या सर्व ९ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे.
-
वर्धा जिल्ह्यातल्या ५० ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे निकाल आज जाहीर झाले. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या हाती असलेल्या अनेक ग्रामपंचायतीवर यावेळी मतदारांनी काँग्रेसला कैाल दिला आहे.
-
जळगाव जिल्ह्यातील ७८३ पैकी ६८७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपानं वर्चस्व राखलं आहे. भाजपा पुरस्कृत पॅनेलचा बहुतांश ठिकाणी विजय झाला. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी राष्ट्रवादीनं जोरदार टक्कर दिली, काही ठिकाणी मुसंडीही मारली आहे.
-
चंद्रपूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसनं ६५ टक्के, तर महाविकास आघाडीच्या मिळून ७५ टक्के ग्रामपंचायतीत विजय मिळाल्याचा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. हा निकाल म्हणजे जनतेनं महाविकास आघाडीच्या कारभाराला दिलेली पसंती आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. तर दुसरीकडे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपानं एकहाती विजय मिळवला असल्याचा दावा केला आहे.
-
लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांमधे मतदारांनी तरुणांना, शिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिल्याचं दिसून येत आहे. उदगीर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या वर्षानुवर्ष ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. भाजपा आमदार रमेश कराड यांनी लातूर ग्रामीणमध्ये अद्यापही आपलं वर्चस्व आहे हे दाखवण्यात यश मिळवलं आहे. मांजरा साखर पट्ट्यातील प्रमुख गावात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विजय मिळवला असून विलास सहकारी साखर कारखाना असलेल्या कोळी गावात निवळी गावात भाजपाचं संपूर्ण पॅनल विजय झालं आहे, त्यात देवणी तालुक्यात ३४ पैकी चोवीस ग्रामपंचायतीवर भाजपानं ताबा मिळवला आहे.
-
नाशिक जिल्ह्यात बहुतांश ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. मालेगाव तालुक्यात ९६ ग्राम पंचायतीच्या निवडणुका झाल्या. यातल्या बहुतांश ठिकाणी कृषी मंत्री दादा भुसे यांना कौल मिळाला आहे. सिन्नर तालुक्यात सोमठाण ग्राम पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांना त्यांचे बंधू भरत कोकाटे यांच्या पॅनलनं ११ पैकी ७ जागा जिंकून धक्का दिला आहे. नाशिक तालुक्यातल्या पळसे ग्राम पंचायत निवडणुकीत पूर्वाश्रमी शिवसेनेचे असलेल्या नवनाथ गायधनी यांनी काँग्रेस आणि अन्य पक्षांना बरोबर घेऊन १७ पैकी १२ जागांवर विजय मिळवून धक्का दिला आहे. मतमोजणीच्या वेळी लहवीत ग्राम पंचायतीच्या निकालावरून दोन गटात हाणामारी झाली यावेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या व्यतिरिक्त कुठंही अनुचित प्रकार झाल्याचं वृत्त नाही.
-
सिंधुदुर्ग – शिवसेनेचं कायम वर्चस्व राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ग्राम पंचायत निवडणूक निकालात भाजपा नेते नारायण राणे यांचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. ७० पैकी ४२ ग्रामपंचायतीवर भाजपा पुरस्कृत पॅनेलनं झेंडा फडकवला आहे. शिवसेनेला २२ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवता आला आहे. मात्र महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडाला. त्यांना एकही ग्रामपंचायत मिळवता आली नाही. देवगड तालुक्यातली मोंड ग्रामपंचायत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे गेल्यानं महाविकास आघाडीला एकमेव ग्रामपंचायत मिळवता आली. तर तीन ठिकाणी ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. इन्सुलि आणि गोवेरी या दोन ग्रामपंचायतिची त्रिशंकू अवस्था असून अपक्षाच्या हाती सत्तेच्या चाव्या राहिल्या आहेत.
-
जालना जिल्ह्यातल्या सर्व ४४६ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत. भोकरदन तालुक्यातल्या ९१ ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींवर भाजपा पुरस्कृत पॅनलचा विजय झाल्याचा दावा भाजपानं केला आहे. जालना तालुक्यातल्या ८१ पैकी बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजय झाले आहेत. घनसावंगी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर अंबड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं वर्चस्व राहिलं आहे. जाफराबाद तालुक्यातल्या १४ ग्रामपंचायतींवर भाजपा तर एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असून, उर्वरित दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मंठा आणि परतूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी शिवसेना आणि भाजपा पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. भोकरदन इथं मतमोजणी सुरू असताना काही काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
-
नंदुरबार जिल्ह्यातल्या ८७ ग्रामंपचायतीपैकी ८६ ग्रामपंचायतींच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून आता पक्षीय दावे प्रतिदावे रंगु लागले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये काँग्रेसनं जवळपास ३७ ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा केला आहे, तर २७ ग्रामपंचायतींवर भाजपानं विजयाचा दावा केला आहे.
-
सांगली जिल्ह्यात मतदानाआधीच बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीसह एकत्रित निकाल पाहता सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकून काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे. काँग्रेस पॅनल-४९, राष्ट्रवादी पॅनल-३४, स्थानिक आघाड्या- ३४, भाजपा पॅनल-२०, तर शिवसेना पॅनलनं-१५ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. स्थानिक आघाड्या मिश्र असल्यानं प्रत्येक पक्ष त्यावर दावा करत आहे.
-
परभणी जिल्ह्यात ४९८ ग्रामपंचायतच्या निवडणूकीत अनेक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यात तरुणांना यश आलं, तर अनेक ग्रामपंचायतीमध्ये स्पष्ट बहुमत कोणालाही न मिळाल्यानं नवी गणितं मांडायला सुरुवात झाली आहे.