नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार माजी क्रिकेटर गौतम गंभीर आपल्या मतदार संघातील पूर्व दिल्ली भागात जन रसोई रेस्टॉरंट सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे येथे गरजू लोकांना एका रुपयामध्ये पोटभर जेवण दिले जाणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना गौतम गंभीर म्हणाले की, गांधी नगर येथे पहिले रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर प्रजासत्ताक दिनी अशोक नगरमध्येही असेच आणखी एक रेस्टॉरंट उघडले जाईल. आपल्या देशात जात, धर्म, पंथ आणि आर्थिक परिस्थिती विचारात न घेता, प्रत्येकाला निरोगी आणि स्वच्छ अन्न खाण्याचा अधिकार आहे. मात्र गरीब आणि निराधार लोकांना दिवसाचे दोन वेळेचे जेवणही मिळू शकत नाही, ही खेदजनक गाेष्ट आहे.
आगामी काळात गौतम गंभीर यांची दिल्लीच्या दहा विधानसभा मतदारसंघात किमान एक जन रसोई भोजनालय उघडण्याची योजना आहे. देशाच्या सर्वात मोठ्या घाऊक कापड बाजारपेठांपैकी एक असलेल्या गांधीनगर बाजारपेठेमध्ये उघडण्यात येणाऱ्या जन किचनचे पूर्ण आधुनिकीकरण केले जाईल आणि गरजूंना एक रुपयासाठी अन्न पुरवले जाईल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. येथे एकाच वेळी १०० लोकांच्या बसण्याची व्यवस्था असेल, परंतु सध्या कोविड -१९ साथीच्या रोगामुळे केवळ ५० लोकांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. या भोजन थाळीत भात, डाळ आणि भाज्या दिल्या जातील. गौतम गंभीर फाउंडेशन आणि खासदार यांच्या वैयक्तिक संसाधनांद्वारे या प्रकल्पाला अर्थसहाय्य देण्यात येणार असून सरकारची कोणतीही मदत घेतली जाणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.