नाशिक – शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षणीयरित्या वाढत आहे. त्यातच शहरात एक मेसेज सध्या व्हायरल झाला आहे. हा मेसेज गोविंद नगर परिसराचा आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, सत्यम स्वीटच्या परिसराला सील केले असून तेथे एकूण ५६ कोरोना बाधित आढळले आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. या मेसेजची शहानिशा इंडिया दर्पण लाईव्ह ने केली आहे.
हे आहे खरे सत्य
महापालिकेच्या सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्याशी इंडिया दर्पण लाईव्हच्या रिपोर्टरने संपर्क साधला. त्यानुसार, डॉ. पाटील यांनी सांगितले की, गेल्या १० ते १२ दिवसापासून गोविंदनगर परिसरातील सत्यम स्वीट लगतच्या अपार्टमेंटसमध्ये कोरोना बाधित आढळत आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित अपार्टमेंटच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जात आहे. मात्र, गेल्या २ ते ३ दिवसात याठिकाणी आणखी काही कोरोना बाधित आढळून आले. परिणामी, हे बाधित अपार्टमेंट तसेच परिसरातील नागरिकांच्या संपर्कात आले असल्याच्या शक्यतेने बाधितांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सत्यम स्वीट परिसरातील शांतिनिकेतन अपार्टमेंट लगतचा परिसर सील करण्यात आल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी ज्या व्यक्तींना बाधा झाली होती. त्यांची प्रकृती ठीक आहे. केवळ एक किंवा दोन दिवसात त्या भागात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून आलेले नाहीत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.