नाशिक – वाडिवऱ्हे शिवारात नाट्यकलावंतावर गोळीबार केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२६) समोर आला होता. मात्र ग्रामीण पोलिसांच्या तपासात नाट्यकलावंताचा बनाव उघड झाला आहे. कर्जबाजारीपणामुळे गोळीबार केल्याचा बनाव केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नाट्यकलावंतासोबत त्याचे तीन साथिदार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरातील कॉलेजरोड परिसरात राहणाऱ्या स्वप्निल नंदकिशोर दंडगव्हाळ हा नाट्यकलावंत एमएच १५ ईपी १४३४ क्रमांकाच्या कारने नाशिकला येत होता. मुंबई आग्रा महामार्गावरील वाडिवऱ्हे शिवारातून जात असताना रायगडनगर जवळील परिसरात दुचाकीस्वार व्यक्तींनी गोळीबार करीत प्राणघातक हल्ला केल्याचे स्वप्निलने पोलिसांना कळवले. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून तपासास सुरुवात केली. मात्र स्वप्निलने दिलेल्या घटनाक्रमानुसार व परिसरातील परिस्थितीनुसार विसंगती आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी स्वप्निलकडेच सखोल चौकशीस सुरुवात केली. त्यात स्वप्निलने खरा घटनाक्रम सांगत गोळीबाराच्या नाटकावर पडदा टाकला. कर्जबाजारी झाल्याने कर्ज दिलेले लोक स्वप्निलकडे पैशांसाठी तगादा लावत हाेते. सततच्या तगाद्यातून सुटका करुन घेण्यासाठी स्वप्निलने स्वत:कडील बेकायदेशीर पिस्तुलमधून वाहनावर गोळीबार करीत स्वत:वर प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव केल्याचे उघडकीस आले. तसेच या गुन्ह्यात त्यास साथ देणाऱ्या केशवर संजय पोतदार (२५, रा. इंदिरानगर) व रौनक दीपक हिंगणे (३१, रा. गुरुद्वारा रोड), आसिफ आमिन कादरी (३५, रा. मोठा राजवाडा) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील केशवर रौनक यांना गोळीबार झालेल्या ठिकाणाजवळ बोलवून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल दिले. तर केशव याने हे पिस्तुल आसिफकडे लपवण्यासाठी दिले. पोलीस अधीक्षक सचीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, अनिल वाघ, सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ गुरुळे, रवींद्र शिलावट, हवालदार बंडू ठाकरे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.