नाशिक – नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत आदिवासी व ग्रामीण भागातील अती तीव्र कुपोषित (SAM) व तीव्र कुपोषित (MAM) बालकांच्या माता, गरोदर महिलांना गोधडी शिवणे प्रशिक्षण देणे – शिवलेल्या गोधडी जिल्ह्यातील नव्याने प्रसुती होणा-या मातांना उपलब्ध करुन देणा-या योजनेसाठी निधी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आर्कि.अश्विनी अनिल आहेर यांनी केली आहे.
बैठकीत बोलतांना आहेर म्हणाल्या की, याबाबत जि.प.महिला व बालकल्याण समिती सभेत सुद्धा ठराव करण्यात आलेला आहे. सदर योजनेत गोधडी शिवणेची मजुरी देवून याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देणे आदिवासी भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे आहे. शिवलेली गोधडी या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यामध्ये ठेवण्यात येतील, तेथून ही गोधडी प्रसुती झालेल्या मातांना उपलब्ध करुन देण्यात येतील. सदर योजना सध्यस्थितीत महाराष्ट्रातील पालघर, गडचिरोली,वाशिम, उस्मानाबाद व नंदुरबार जिल्हयात नाविन्यपूर्ण योजनांतर्गत राबविण्यात येत आहे. सदर योजनेस एकात्मता बालविकास सेवायोजना आयुक्त यांनी सुध्दा मान्यता दिली आहे. सदर योजनेमुळे आदिवासी भागातील महिलाचे सक्षमीकरण होईल व रोजगार निर्मितीला चालना मिळेल असेही आहेर यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समिती – नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत सन २०२०.२०२१ (पुर्ननियोजनात) व सन २०२१-२२ मध्ये १ कोटी ८६ लाख ५० हजार रुपयाचा निधी जिल्हा परिषद नाशिक महिला व बालविकास विभागास उपलब्ध करून द्यावा अशी विनंती सुध्दा आहेर यांनी केली.