नाशिक – गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन सांडपाण्याचा एकही थेंब नदीपात्रात जाणार नाही. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने पाण्याचे वॉटर बजेटिंग करुन पाण्याचा ताळेबंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले.
गोदावरी नदी प्रदूषण संदर्भात मंगळवारी नाशिक तालुक्यातील ओढा ग्रामपंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय उपसमितीची सभा घेण्यात आली. समितीचे अशासकिय सदस्य राजेश पंडीत, सिनेअभिनेते तसेच नमामि गोदा संस्थेचे सदस्य किरण भालेराव, सवंगडी संस्थेचे नितिन हिंगमिरे आदि उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना लीना बनसोड यांनी गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी आणि तिच्या शुध्दीकरणासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देतानाचा पाण्याच्या पुर्नभरणासाठी शिवारात पडणारे पाणी शिवारातच मुरविणे, प्रत्येक घरी वॉटर मिटर बसविणे, रेन वॉटर हार्वेस्टिेंग करणे, नवीन घराची परवानगी देताना रुफ वॉटर हार्वेस्टिंगची अट घालणे, गावातील सर्व कुटुंबांची नळजोडणी करणे, रासायनिक खतांचा वापर कमी करणे आदि विषयांबाबत मार्गदर्शन केले.
ओढा ग्रामपंचायतीमध्ये सुरु असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामाला भेट देऊन सदर प्रकल्पाव्दारे निर्माण होणा-या पाण्याचा पुर्नवापर करण्याच्या सुचना ग्रामपंचायतीला दिल्या. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नव्याने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची तसेच पाणी शुद्धीकरणासाठी बसविण्यात आलेल्या क्लोरीनेटरची पाहणीही मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केली. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, गोवर्धन,महादेवपूर, एकलहरे, संसरी,लाखलगाव येथील ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक उपस्थित होते.