नाशिक – पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून अथवा साठवून त्याचा वापर करणे अन्य मार्गांनी पाण्याची बचत व संवर्धन करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग ही उत्तम प्रणाली आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पाण्याची बचत व संवर्धनासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रणाली कार्यान्वित करण्याच्या सूचना सर्व शासकीय विभागांना देण्यात येणार असल्याचे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितलेआहे.
गोदावरी प्रदुषण नियंत्रण समितीची आढावा बैठक ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आली.त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस उपआयुक्त अमोल तांबे, याचिकाकर्ते निशीकांत पगारे, राजेश पंडीत आदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
विभागीय आयुक्त गमे म्हणाले, गोदापात्रात वाढणाऱ्या पानवेलींमुळे प्रदुषणाची समस्या निर्माण होत असल्याने स्मार्ट सिटी कार्यालयाने गोदावरी नदीच्या पात्रात वाढणाऱ्या पानवेली वेळोवेळी काढव्यात. गोवर्धन गावात रेन वॉटर हार्वेस्टींग प्रणाली आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया राबविण्यात आली तर गोदावरी प्रदुषण टाळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या दोन्ही ही प्रकल्प या गोवर्धन गावात राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावे, अशा सूचना गमे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
गोदावरी नदीपात्रात प्रदुषण थांबविण्याकरीता व त्या संबधित कार्यवाही करण्यासाठी उच्चन्यायालय, मुंबई यांनी ४ पोलीस उपनिरीक्षक व ३० पोलीस शिपाई नियमित देण्याचे आदेश केले होते. परंतु अद्यापही मनुष्यबळ उपलब्ध नाही. परंतु लवकरच मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गमे यांनी सांगितले.
गोदावरी नदीवर प्रदुषण करणाऱ्यांवर मुंबई कायद्याप्रमाणे जानेवारी ते जुलै २०२० पर्यंत १४५ गुन्ह्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत कलम १०८,११७ अन्वये ३ हजार ९१३ प्रकरणांवर कार्यवाही करुन ८२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कलम १८८ प्रमाणे आज पर्यंत ६३ गुन्हे नोंदवून कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती, विभागीय आयुक्त गमे यांनी दिली.