नाशिक – नाशिक स्मार्ट सिटीच्या बैठकीतील ठरावानुसार गोदावरी नदी पात्रातील जिवंत जलस्रोतांचे अस्तित्व तपासणीसाठी स्मार्ट सिटी मार्फत ट्रायल बोअर घेण्यात आला. त्यात मुबलक प्रमाणात पाणी लागले आहे. २४ तास मोटर चालवून सुद्धा बोअर मधील पाणी आटत नाही. यावरून हे सिद्ध होते की, नदी पात्रातील जिवंत जलस्रोत आजही सुस्थितीत आहे. त्यामुळे विलंब न लावता रामकुंडासह श्री गोदावरी नदी पात्रातील उर्वरित १२ पुरातन कुंडांचे सिमेंट-कॉक्रीटीकरण काढावे असे नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना याचिकेकर्ते देवांग जानी यांनी निवेदन सुपूर्द केले.
या निवेदनात म्हटले आहे की, गोदावरी नदी पात्रातील कॉक्रीटीकरणाला तब्बल १९ वर्षे झाली. त्यानंतर सुद्धा पात्रातील जिवंत जलस्रोत मुबलक प्रमाणात सुस्थितीत असल्याचे ट्रायल बोअरच्या प्रयोगातून सिद्ध झालेले आहे. स्मार्ट सिटीच्या बैठकीत ठरल्यानुसार क्षणाच्या विलंब न लावता श्री गोदावरी नदीतील रामकुंडासहित उर्वरित १२ पुरातन कुंडे सिमेंट-कॉक्रीटच्या पाशातून मुक्त करावी असे याचिकाकर्ता देवांग जानी यांनी म्हटले आहे.
भूगर्भातील जल शास्त्राची एकंदरीत वैज्ञानिक परिभाषा बदलणारा विस्मयकारी चमत्कार, अर्थात ट्रायल बोअरमधून एका मिनिटाला ४१.३६ लिटर पाणी २४ तास नॉन-स्टॉप येणे या गोष्टीचा सुध्दा त्यांनी निवेदनात उल्लेख केला.