नाशिक – रेल्वे विभागाच्या आयोजित व्हर्चुयल बैठकीत दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॅा. भारती पवार यांनी चाकरमान्यांची मागणी असलेली गोदावरी एक्सप्रेस तसेच इगतपुरी शटल सुरू करावी, काशी एक्सप्रेसला थांबा मिळावा, लासलगाव येथे किसान रेलला कायमस्वरूपी थांबा मिळावा अशी मागणी केली.
या बैठकीत त्यांनी केेंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान रेल सुरू केली त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयाचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदार संघात येत असलेल्या रेल्वेच्या समस्यां संदर्भात चर्चा करत जनतेला, प्रवाशांना, शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीला अजून कशाप्रकारे जास्त सुविधा उपलब्ध करता येतील याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. यात प्रामुख्याने तसेच मनमाड अंडरपास गेट नंबर १,२,३, त्याचप्रमाणे तळेगाव समिट येथिल अंडरपासच्या गेट नंबर १०७,१०८,१०९ येथे पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून नागरिकांना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो व इतर गावांशी त्यांचा संपर्क तुटतो व साचलेल्या पाण्यामुळे रस्तेही खराब होतात यामुळे ही समस्या वारंवार उद्भवू नये म्हणून उर्वरित अंडरपासचे पुन्हा एकदा रीडिझाईन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न व्हावा अशीही सूचना मांडण्यात आली. मतदार संघातील बरेच रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम अपुर्ण असल्याने ते पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सरकार त्यांच्या वाट्याचा निधी उपलब्ध करून देत नाही म्हणून ते काम प्रलंबित असल्याचे सांगितले.