नाशिक : गोदावरी नदी पात्राच्या सुशोभिकरण करण्याचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या गोडावून मधील साहित्यावर सुरक्षारक्षकांनीच डल्ला मारल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या गोडावून मधून सुमारे ३६ हजार रूपये किमतीचे लोखंडी साहित्य चोरीस गेले असून याप्रकरणी तीन सुरक्षारक्षकांवर पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत बने,ओम ढगे व चंद्रकांत इंगोले असे संशयीत सुरक्षारक्षकांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे येथील सचिन सुभाष दुसाने यांनी तक्रार दाखल केली आहे. गोदावरी नदी पात्राच्या सुशोभिकरणाचे काम बी.जी.शिर्के या कंपनीने घेतले आहे. शिर्के कंपनीचे पंचवटी येथील अमरधाम परिसरात गोडावून असून या गोडावूनमध्ये हा चोरीचा प्रकार घडला. संशयीत या गोडावूनची देखभाल करीत असतांना त्यांनी गोडावूनमधून सुमारे ३६ हजार ४८ रूपये किमतीचे लोखंडी ऐवज चोरून नेला. त्यात रॉड,नट बोल्ट,वायसर तसेच जॅक आणि लोखंडी पाईपांचा समावेश आहे. अधिक तपास पोलीस नाईक सोनवणे करीत आहेत.