पुणे – वृत्तबद्ध कवितेला नव्या रुपात वाचताना अत्यंत आनंद होत आहे. संपूर्ण जगातील मराठी वाचकाला हा आनंद मिळणे फार महत्वाचे आहे. याकरिता गोदातीर्थ समूहाच्या पुढाकाराने कवी व साहित्यिकांना कवितेतील छंद व वृत्त समजायला सोपे करून दिल्याने याचा साहित्य क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार असल्याचे प्रतिपादन गायक व संगीतकार सुधाकर कदम यांनी केले.
कोथरूड येथील मनोहर हॉलमध्ये आयोजित मदत वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने ५ हजार रु.रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह असे स्वरूप असलेला ‘ प्रतिभा गौरव पुरस्कार ‘ समूह संस्थापक कवी संतोष वाटपाडे,डॉ.अमितकुमार खातू,अश्विनी देशपांडे,निरुपमा महाजन, चिंतामणी जोगळेकर,अभिजित काळे आदींना प्रदान करण्यात आला. त्यावेळी कदम उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण, गीतकार वैभव देशमुख,संस्थेच्या अध्यक्षा दीपाली वारुळे, सचिव उमेश कोठीकर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण आपल्या मनोगतातून बोलतांना वृत्तबद्ध कवितेला नवसंजीवनी देणे फार महत्वाचे होते,या कामाने कुसुमाग्रजांच्या पुण्यभूमीत गोदातीर्थ समूहाच्या रूपाने सुरुवात झाली ही जणू कुसुमाग्रजांचीच इच्छा असल्याचे सांगितले. तर सन्मानाला उत्तर देतांना डॉ. अमितकुमार खातू म्हणाले कि,या विनामूल्य साहित्यसेवेच्या व्रताला मदत वेल्फेअर ट्रस्टने पुरस्कृत केल्याने नक्कीच उभारी मिळणार आहे. यावेळी गझलकार अनिल आठलेकर,गोविंद नाईक, प्रमोद खराडे,तन्मयी रानडे-जोशी, प्रशांत पोरे,प्राजक्ता पटवर्धन,विश्वास पाटील आदी उपस्थित होते.