नाशिक – गोट्या खेळताना झालेल्या भांडणातून एकास मारहाण व शिवीगाळ केल्याचा प्रकार मंगळवारी (२२ सप्टेंबर) दुपारी पंचवटी परिसरात घडला. याप्रकरणी आकाश कैलास झुरडे ( २०, रा. अवधूतवाडी, दिंडोरी रोड) याने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष गांगुर्डे (रा. बुध्दविहार, सम्राट नगर) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश हा मंगळवारी दुपारी ताच्या मुलासोबत गोट्या खेळत होता. यावेळी खेळात झालेल्या भांडणातून संशयित गांगुर्डे याने झुरडे यास मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार शेख तपास करत आहे.
—
दारु पाजून महिलेवर अत्याचार
नाशिक – दारु, गांजा पाजून व मोबाइलवरील संभाषण घरच्यांना पाठवण्याची धमकी देत महिलेवर आत्याचार करणार्या संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश उर्फ पप्पु गांगुर्डे (रा. शिवाजीनगर, जेलरोड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताने फिर्यादी महिलेस बळजबरीने वेळोवेळी दारु व गांजा पाजला. तसेच तिची आजी व भावाला मारण्याची धमकी दिली. मोबाइलवरील संभाषण घरच्यांना पाठवण्याची धमकी देत मारहाण करत शारिरीक संबध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरिक्षक एम. बी. राऊत तपास करत आहे.
—
छेडखानीच्या वादातून सीसीटीव्हीची तोडफोड
नाशिक – पाथर्डी फाटा परिसरातील अंजनी लॉंन्स परीसरात विवाहितेची छेड काढल्याच्या वादातून टवाळखोराने सीसीटीव्हीची तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी हर्षल बापू बोडके (रा.पाली हिल अपार्टमेंट यांच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात तोडफोड, शिवीगाळ आणि दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टवाळखोर तरुण वारंवार छेड काढत असल्याने त्याचा जाब विचारला असता हर्षल बोडकेचे वडील बापू सोपान बोडके आणि आई अंजना बोडके यांनी शिवीगाळ केली तर हर्षल बोडकेने दरवाजावर लावलेला सीसीटीव्ही फोडत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. हर्षल बोडकेविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात कलम ५०४,कलम ५०६ आणि कलम ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.