श्रीराम जय राम जय जय राम
आज महाराजांचा पुण्यतिथी उत्सवाचा दिवस. श्रीराम जय राम जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने: माझ्याकडे असलेल्या या आगळ्यावेगळ्या पुस्तकाची ओळख आणि त्या अनुषंगाने आठवण मी सांगणार आहे. माझ्याकडे आता असलेली 2017ची पुनर्मुद्रित 55 वी आवृत्ती आहे. पुस्तकाला के. वि. बेलसरे यांची विवेचक प्रस्तावना आहे. ही सगळी प्रवचने गोविंद सीताराम गोखले यांनी संग्रहित केली आहेत. या ग्रंथाची कानडी, हिंदी, गुजराती या भाषांमध्ये तसेच इंग्रजी आणि फ्रेंच भाषांमध्ये ही भाषांतरे झाली आहेत. प्रवचनाच्या या ग्रंथाचे सर्व हक्क गोंदवले संस्थानला अर्पण केले आहेत. श्री महाराजांची ही रसाळ आणि प्रभावी निरुपणे आहेत.
या पुस्तकाची रचना अतिशय वेगळी आहे. प्रत्येक तारखेला एक पान एक प्रवचन अशी त्याची रचना आहे. सर्व निरूपणाची मांडणी विषयाच्या दृष्टीने पुढील प्रमाणे केली आहे. जानेवारी नाम, फेब्रुवारी नाम, मार्च एप्रिल संत सत्पुरुष, मे साधन, जून परमार्थ, जुलै सद्गुरु, ऑगस्ट आनंद समाधान, सप्टेंबर अखंड नामस्मरण, ऑक्टोबर भगवंत, नोव्हेंबर भगवंत, डिसेंबर नाम. पुस्तकाच्या सुरुवातीला के. वि. बेलसरे यांनी लिहिलेले श्रीमहाराजांचे व्यक्तिदर्शन आहे. उत्तम फोटोग्राफ आहेत.
पंचवीस वर्षांपूर्वी सौभाग्यवतीची तब्येत बिघडली. रोगनिदान होत नव्हते. दिवस पुढे पुढे सरकत होते. त्यावेळी समीर तीन वर्षांचा आणि गायत्री नऊ वर्षांची. रोगनिदान होण्याकरता पूर्ण वैद्यकीय प्रयत्न करत होतो. पण निराशा पदरी येत होती. तेव्हा एकमेकांचे मनोधर्य वाढवण्याकरता दररोज एक प्रवचन वाचायला सुरुवात केली. प्रयत्न करायला पाहिजेत, ते करायला लागतात, पण त्याला कुठेतरी भगवंताचे अधिष्ठान असावे लागते. रोगनिदान झाले, कठीण दिवस निघून गेले. पुस्तकाशी निगडीत अशीही आठवण असू शकते. नंतर मी हे पुस्तके अनेकांना भेट दिले. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम.
– मिलिंद चिंधडे, नाशिक