नवी दिल्ली – देशातील सर्वात जुना आणि मोठा असलेला काँग्रेस पक्ष सध्या एका संकटाच्या काळातून मार्गस्थ होत आहे. निवडणुकांमध्ये सलग होत असलेल्या पराभवामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये निराशा पसरलेली आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसच्या १७० आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत दुस-या पक्षात प्रवेश केला आहे.
नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) नं २०१६-२०२० दरम्यान झालेल्या निवडणुकांच्या वेळी दिल्या गेलेल्या प्रतिज्ञापत्रांचं विश्लेषण केले. त्यात असे आढळले की, काँग्रेसच्या १७० आमदारांनी दुस-या पक्षात प्रवेश केला आहे. तर भाजपच्या केवळ १८ आमदारांनी दुस-या पक्षात प्रवेश केला आहे.
एडीआरनं अहवालात म्हटले आहे की, २०१६-२०२० दरम्यान पक्ष सोडून पुन्हा निवडणूक लढवणा-या ४०५ आमदारांपैकी १८२ भाजपमध्ये गेले. तर २८ आमदार काँग्रेस आणि २५ आमदार तेलंगणा राष्ट्र समितीत गेले. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान पाच लोकसभेचे सदस्य भाजपला सोडून दुस-या पक्षात गेले. २०१६-२०२० दरम्यान काँग्रेचे सात राज्यसभा सदस्यांनी दुस-या पक्षात प्रवेश केला. मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आमदारांच्या पक्षांतरामुळे सरकार स्थापन करण्याच्या किंवा सरकार कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
२०१६-२०२० दरम्यान पक्षांतर करून राज्यसभा निवडणूक पुन्हा लढणा-या १६ पैकी १० सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर पक्षांतर केलेल्या १२ लोकसभा सदस्यांपैकी पाच सदस्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एडीआरने गेल्या पाच वर्षांमध्ये दिल्या गेलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.