नाशिक – देशातील आयआयटी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग व पदव्युत्तर शिक्षणासाठी ‘गेट’ परीक्षा घेतली जाते. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी घेतल्या जाणाऱ्या गेटच्या परीक्षेच्या अर्जसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आयआयटी मुंबईकडून यासंबंधी तपशील देण्यात आला असून १२ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी याआधी ७ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, १२ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. देशभरातील विद्यार्थ्यांसाठी गेट २०२१ परीक्षेसाठी ११ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे. मुंबईसह देशभरातील बंगळुरू, मद्रास, दिल्ली, गुवाहाटी, कानपुर, खरगपूर आणि रुरकी या आयआयटी संस्थां गेट परीक्षा घेत असतात. यासाठी मुख्य आयोजक संस्था म्हणून आयआयटी मुंबईकडे जबाबदारी देण्यात अली असून संबंधित तपशील त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. यावर्षी ५ ते ७ फेब्रुवारी असा पहिला टप्पा आणि १२ ते १४ फेब्रुवारी या दुसऱ्या टप्प्यात परीक्षा घेतल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://appsgate.iitb.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.