मनमाड पासून ७ किमी अंतरावर पानेवाडी-धोटाने परिसरात इंडीयन ऑयल कंपनीचा गॅस रिफिलिंग प्रकल्प असून त्यातून रोज ट्रकच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो.त्यासाठी ट्रक वाहतूकसाठी निविदा काढली जाते. प्रकल्पातील काही अधिकारी मनमानी करून अपमानास्पद वागणूक तर देत असतातच शिवाय आता त्यांनी स्थानिक ऐवजी बाहेरच्या वाहतूक दारांना सिलेंडर वाहतूक करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप स्थानिक वाहतूकदारांनी केला आहे.
आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पातुन सिलेंडर वाहतुकीचे काम करीत असतांना आम्हाला डावलून बाहेरच्या वाहतूक दारांचा विचार केला जात आहे हा आमच्यावर मोठा अन्याय आहे.असे वाहतूक दारांचे म्हणणे आहे.आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांची दोन वेळा भेट घेऊन या बाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र अधिकाऱ्यांनी आमचे काहीच ऐकले नाही म्हणून नाईलाजाने आम्हाला संपाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे नाना पाटील,संजय पांडे,कांतीलाल लुणावत, संजय चोपडा,रतनशेठ शाकाव्दीपी वाहतूक दारांनी सांगितले. वाहतूक दारांनी आज शनिवार पासून त्यांचे ट्रक उभे करून संप सुरू केला आहे.जर हा संप लवकर नाही मिटला तर राज्यातील विविध भागात केला जाणारा गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प होऊन सिलेंडर टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे