नाशिक – पंचवटी अमरधाममधील गॅसदाहिनी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. तसेच सहाही विभागातील अमरधाममध्ये कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आयुक्त कैलास जाधव यांनी तसे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. यामुळे कोरोना मृतदेहांवर वेळेतच अंत्यसंस्कार होणार आहेत.
शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला असतानाच पंचवटी अमरधाममधील गॅसदाहिनी खराब झाली. मृतदेहाभोवती वेष्टन केलेल्या प्लास्टीकमुळे गॅस दाहिनी मध्ये तांत्रिक बिघाड झाला. बेल्ट जळाल्याने गॅस दाहिनी बंद पडली. या दाहिनीच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने करण्याचे आदेशित करण्यात आले होते. दरम्यान, मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी विद्युत दाहिनीवर प्रचंड ताण आला. परिणामी, अनेक मृतदेह वेटिंगवर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. याची तातडीने दखल आयुक्त जाधव यांनी घेतली.
सद्यस्थितीत कार्यरत मक्तेदारामार्फत मनपाच्या सहाही विभागातील स्मशानभूमी मध्ये सरकारी नियमानुसार दहनविधी करण्याचे निर्देशित केले. त्यानुसार सहाही विभागातील प्रत्येक स्शानभूमीत एकूण ८ बेड कोविड रुग्णाकरीता तसेच ज्यांना कोरोनाची लागण नाही असे मृत व्यक्तींकरिता एकूण २ बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्याशिवाय गॅस दाहिनीही तातडीने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता मृतदेहांचा अंत्यविधी तत्काळ होऊ शकणार आहे.