नवी दिल्ली – दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महत्त्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, जी प्रमुख घटना झालेली आहे, त्यावरून लक्ष विचलीत करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. अंबानींच्या घरासमोर जे वाहन ठेवलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या, याचा शोध यावरच आमचं लक्ष आहे. यानंतर यथायोग्य उर्वरीत गोष्टी होतील असेही ते म्हणाले.
सध्या एटीएस व एनआयए या प्रकरणाची चौकशी करत आहे. या चौकशीच्या माध्यमातून काही ना काही ठोस अशा गोष्टी बाहेर येतील, असा आम्हाला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावरही ते बोलेले, फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांवर आरोप झाले, त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही. मी त्या खोलात जाणार नाही, त्यांच्याशी आमची काही त्याबाबतीत स्पर्धा नाही. महत्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलीत करण्याचा कुणाचा जर प्रयत्न सुरू असेल, तर ते देखील होता कामा नये.