मुंबई – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या विविध आरोपांप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना बार आणि रेस्टॉरंट्समधून १०० कोटी रुपये जमा करण्यास देशमुख यांनी सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. याचप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज बुधवारी (३१ मार्च) सुनावणी होणार आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापनाशी संबंधित मोठा भ्रष्टाचार देशमुख करीत असल्याचा सिंग यांचा आरोप आहे. सिंग यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील विक्रम ननकणी यांनी सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याचिकेचा मंगळवारी संदर्भ दिला. आणि त्यावर त्वरित सुनावणी घेण्याची विनंती केली.
ननकणी म्हणाले की, एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने राज्याच्या एका मंत्र्यावर लावलेला आरोप गंभीर असून सीबीआय चौकशी करण्याची विनंती याचिकेत मुख्यतः केली आहे. याचिका सुनावणीसंदर्भातील याचिकेद्वारे आपण कोर्टाचे समाधान करू, असेही ननकणी म्हणाले.
सिंग यांनी उच्च न्यायालयाला विनंती केली की, सीसीटीव्ही फुटेज नष्ट होण्यापूर्वी सुरक्षित करावे. तसेच याचिकेत विनंती करण्यात आली आहे की, २०२० पासून सर्व संप्रेषणे रेकॉर्डवर नोंदविण्याचेही राज्य सरकारला निर्देश द्यावे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी देशमुख यांच्याविरोधात पोलिस तैनात करणे आणि बदली करण्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.