नवी दिल्ली ः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणाचे राज्यात पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या प्रकरणावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. शरद पवार यांनी नवी दिल्ली इथे पत्रकार परिषद घेऊन यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार म्हणाले, की परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, ठोस पुरावा दिलेला नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन आल्यावर हे पत्र समोर आले आहे. बदली झाल्यावरच आरोप केले आहेत. हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, यामध्ये यश येणार नाही. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा.
गृहमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशीची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या उत्तम अधिका-यांकडून चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली. राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. असेही शरद पवार म्हणाले. गृहमंत्री देशमुख सोमवारी मुंबईत आल्यावर त्यांचे म्हणणे ऐकले जाईल. त्यानंतर इतर नेत्यांशी बोलून देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होईल.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने आक्रमक भूमिका घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीदेखील गृहमंत्र्यांची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केलेली आहे.