मुंबई – माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर आता भाजपच्या वतीने देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. नागपूर येथे गृहमंत्री देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आंदोलन नागपूरच्या संविधान चौकावर सुरू असताना अचानकच भारतीय जनता युवा मोर्चाचे काही कार्यकर्ते सिव्हिल लाइन्स परिसरामधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, तसेच रस्त्यावर बसून धरणे आंदोलनही केले. गृहमंत्र्यांवर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. त्याचवेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अचानक सर्व सुरक्षा व्यवस्था फोल ठरवत थेट गृहमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले आहे. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या सुमारे २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि आता सर्वांना पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले आहे. दरम्यान, गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक कोल्हापूर यासह राज्यात विविध ठिकाणी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.