नाशिक – नाशिक शहर व जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत व विविध तक्रारीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शनिवार २ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२ वाजता हौसिंग दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे, असे नाशिक तालुका सहकारी संस्थेचे उपनिबंधक फयाज मुलानी यांनी शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. शहरातील तिडके कॉलनी येथील बाजीरावनगर येथे जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्या. नाशिक कार्यालय सभागृह येथे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांच्या उपस्थितीत सदर बैठक होणार आहे.
शासकीय प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, १ जानेवारी २०२१ ते १५ जानेवारी २०२१ या कालावधीत सहकार खात्यामार्फत मानीव अभिहस्तांतरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश संबंधीत सहकारी गृहनिर्माण संस्थांना विकासकाडून जमिनीचे कायदेशीर हक्क व मालकी प्रदान करणे हा आहे. यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या चेअरमन किंवा सचिव व सभासद, प्रतिनिधी यांनी मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेत सहभाग घेवून चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी हौसिंग दरबारास मोठ्या संख्येने हजर रहाण्याचे आवाहन उपनिबंधक सहाकरी संस्था, नाशिक तालुका फयाज मुलानी यांनी केले आहे.